नागरिकांकडून नाराजी व्यक्त
। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ संकुलन विकास प्राधिकरण विभागांतर्गत नेरळ ग्रामपंचायतीसह ममदापूर व कोल्हारे ग्रामपंचायती येत असून, बांधकाम व्यावसायिकांकडून बांधकाम परवानगीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास निधी प्राप्त होत असताना, मात्र नेरळ पोस्ट ऑफिस ते नेरळ विद्या मंदिर शाळा व गोकुळ धाम सोसायटीकडे जाणार्या रस्त्याची अक्षरश: दुरवस्था झाली आहे.
दरम्यान, नेरळ संकुलन विकास प्राधिकरण विभागाच्या निद्रावस्थेत असल्यामुळे या रस्त्यावरून शाळेतील विद्यार्थी व नागरिकांना खडतर प्रवास करावा लागत आहे. वयोवृध्दांना कंबर, मान व मणक्याच्या आजारांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आता पावसाळा गेला, निवडणुकाही संपल्या, आता तरी या रस्त्याच्या दुरुस्तीकडे नेरळ संकुलन विकास प्राधिकरण विभाग दखल घेणार का, असा प्रश्न मात्र सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने वयोवृद्धांना प्रवास करताना अक्षरशः मान, कंबर व मणक्याच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. या बाबीची आता तरी दखल प्रशासन घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर निवडुणका पार पडल्या आता तरी लोकप्रतिनिधींनी वयोवृद्धांना होणार्या व्याधी प्रती रस्त्याच्या मंजुरीसाठी लक्ष घालावे.
– योगेश नाईक, स्थानिक नागरिक,
सर्मथ नगर, ममदापूर






