वृक्षतोडीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

। नवी मुंबई । वार्ताहर ।
महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची परवानगी न घेताच वृक्षतोड करणार्‍यांविरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश संबंधित पोलीस अधिकार्‍यांनी द्यावेत, अशी विनंती महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना दोन वर्षांपूर्वी केली होती. मात्र, वाशीतील अरेंजा कॉर्नर ते कोपरी सिग्नल आणि आता एमआयडीसी परिसरात करण्यात येणार्‍या वृक्षतोडीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यामुळे महापालिका आपल्याच आदेशाला विसरल्याची टीका पर्यावरणप्रेमी करत आहेत.


वृक्षांमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. त्यामुळे पर्यावरणाचा होणारा र्‍हास रोखण्यासाठी वृक्षतोड थांबणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे नवीन वृक्षारोपण करण्यासोबतच वृक्षतोड रोखण्याकडेही विशेष लक्ष दिले गेले पाहिजे. त्यामुळे अत्यावश्यक कारणासाठी जरी एखादे झाड तोडणे गरजेचे असले तरी अथवा वृक्षछाटणी करावयाची असेल तरी त्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली वृक्ष प्राधिकारणाची रितसर परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, अनेकदा अशाप्रकारची परवानगी न घेताच वृक्षतोड करणे अथवा वृक्षछाटणी होत आहे.

संबंधित विभाग कार्यालय क्षेत्रातील उद्यान अधिक्षकांमार्फत हे दखलपात्र गुन्हे दाखल करणे व या नोंदीत गुन्ह्यासंदर्भात न्यायालयीन प्रकरणांबाबत महानगरपालिकेचा विधी विभाग आणि वकील यांच्याशी समन्वय ठेवून प्रकरणांचा निपटारा करण्याची जबाबदारी त्या-त्या परिमंडळांसाठी परिमंडळ 1 व 2 च्या प्रभारी उद्यान अधिकारी यांच्यावर सोपविली होती.

Exit mobile version