सात ग्रामपंचायतींचे कारभारी प्रशासक

ऑक्टोबर मध्ये संपली मुदत; आगामी निवडणुकीकडे सर्वपक्षीयांचा डोळा

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील सात ग्रामपंचायती यांच्या मुदती ऑक्टोबर मध्ये संपल्या आहेत. त्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये आता सरपंचाऐवजी प्रशासक कारभार पाहणार असून, त्या सात ग्रामपंचायत मधील ग्रामस्थ यांचे कधी निवडणुका जाहीर होणार याकडे डोळा लागून राहिला आहे.

तालुक्यातील दहिवली तर्फे वरेडी, उकरूळ, कळंब, वेणगाव, वावळोली, कोंदिवडे आणि मांडवणे या सात ग्रुप ग्रामपंचायती यांच्या सदस्य मंडळाच्या मुदती संपल्या आहेत. 28 ऑक्टो. अखेर त्या सात ग्रामपंचायतींमधील लोकनियुक्त सदस्य मंडळ यांची मुदत संपली आहे. या सर्व ग्रामपंचायतीमध्ये आगामी काळात सार्वत्रिक निवडणूक होण्याची शक्यता असून, सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेता राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यात सार्वत्रिक निवडणूक होण्याची शक्यता असलेल्या सात ग्रामपंचायतीमधील काही ग्रामपंचायती राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. 2017 मध्ये झालेल्या त्या सर्व सात ग्रामपंचायतींमध्ये सरपंच हे थेट जनतेतून निवडून आले होते. तर, या सर्व ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक घेण्यासाठी मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.

वावळोली ग्रामपंचायत मध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार असून, ही ग्रामपंचायत कर्जतचे विद्यमान आ. महेंद्र थोरवे यांची ग्रामपंचायत आहे. त्यात या ग्रामपंचायतीमध्ये आ. थोरवे यांचा प्रमुख विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाची साथ मिळणार आहे. त्यामुळे वावळोली ही निवडणूक जिंकणे आ. थोरवे यांच्यासाठी वावळोली ग्रामपंचायत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची बनली आहे. ऑक्टोबर अखेर मुदत संपलेल्या सात ग्रामपंचायतींमध्ये विद्यमान मावळते सरपंच हे वेगवेगळ्या पक्षाचे होते आणि त्यावेळी यासर्व ग्रामपंचायती पुन्हा जिंकण्याचे मोठे आव्हान त्या पक्षांसमोर असणार आहे.

उकरूल ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तर दहिवली तर्फे वरेडीमध्येदेखील सरपंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निवडून आला होता. तर वावळोलीमध्ये शिवसेना पक्षाचा उमेदवार थेट सरपंच म्हणून निवडून आला होता आणि आज त्या शिंदे गटात आहेत. कळंबमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या थेट सरपंच बनल्या होत्या, नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता आणि आज ते शिंदे गटात आहेत. वेणगावमध्येदेखील शिवसेनेचा थेट सरपंच निवडून आला होता आणि आज ते माजी सरपंच शिंदे गटात आहेत. कोंदिवडेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या थेट सरपंच निवडून आल्या होत्या. कोरोना काळात त्यांचे निधन झाले होते.

Exit mobile version