सांडपाण्याच्या निचऱ्याचा अभाव, विद्युत बोर्डचा धोका
| अलिबाग | प्रमोद जाधव |
अलिबाग येथील जुन्या जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीच्या समोरील प्रशासकीय इमारत समस्यांच्या गर्तेत सापडली आहे. या इमारतीच्या भिंती ओल्या झाल्याने विद्युत बोर्डला हात लावणे धोकादायक झाले आहे. खराब झालेल्या खुर्च्या, कागदी खोके आदी साहित्य याच इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर अस्तव्यस्त टाकले आहे. स्वच्छतागृहांची अवस्था बिकट अशा अनेक समस्या या इमारतीमध्ये निर्माण झाल्याने डॉक्टरांसह कर्मचारी आणि रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या तळ मजल्यावर बाह्यरुग्ण कक्ष असून, या कक्षामध्ये केस पेपर काढण्यापासून डोळे, ताप, अस्थिरोग, तंबाखू नियंत्रण कक्ष, स्त्री रोग उपचार केंद्र आहेत. औषध वाटप केंद्राबरोबरच प्रयोगशाळादेखील याच मजल्यावर आहे. पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर जिल्हा शल्यचिकित्सक यांचे कार्यालय असून, बाजूला प्रशासकीय कामकाज करणारे कार्यालय आहे. नाक, कान, घसा, एड्स, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन विभाग, तसेच गेल्या दोन वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांचे कार्यालय आहे. तसेच सध्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे कार्यालय या इमारतीमध्ये आहे. दहा वर्षे जुन्या असलेल्या या इमारतीमध्ये प्रशिक्षणार्थी परिचारिकांचे वसतिगृहदेखील आहे. ही इमारत जिल्हा सामान्य रुग्णालयाची असताना, याठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बोर्ड लावण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य या इमारतीबाबत अनभिज्ञ आहेत. इमारतीचे विद्युत बोर्ड खराब झाले आहेत. भिंतींना ओलसरपणा असल्याने विद्युत बोर्डचा धोका असल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
या इमारतीच्या परिसरात पेव्हर ब्लॉक लावण्यात आले आहे. परंतु, इमारतीमधील सांडपाण्याचा निचरा करण्यास प्रशासन उदासीन ठरत असल्याने इमारतीच्या समोर प्रवेशद्वाराजवळ सांडपाणी साचले आहे. त्यामुळे कर्मचारी, रुग्ण व त्यांचे नातेवाईक नाक दाबून कार्यालयात ये-जा करीत आहेत. या इमारतीच्या तळमजल्यावरील स्वच्छतागृहांची अवस्था बिकट झाली आहे. या स्वच्छतागृहांच्या खिडक्या व पाईप तुटलेले आहेत.
रुग्णालयाच्या आवारात फसवणूक करणाऱ्यांचा वावर अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गेल्या दोन वर्षांपासून सुरु झाले आहे. महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमात फक्त भारत सरकारद्वारा ऑल इंडिया (15 जागा) व महाराष्ट्र शासनमार्फत (85 जागा) प्रवेश दिला जातो. याव्यतिरिक्त कुठल्याच प्रकारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नाही. मात्र, गेल्या वर्षभरापासून या विद्यालयात फसवणूक करणाऱ्यांचा वावर सुरु झाला आहे. एमबीबीएस अभ्यासक्रमात प्रवेश देतो असे सांगून काही मंडळी विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची मागणी करीत आहेत. याबाबत सहा विद्यार्थ्यांची फसवणूकदेखील झाली आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून, कार्यालयाच्या परिसरात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांना सावध राहण्याचे पत्रक लावण्यात आले आहेत.