Neral Gram Panchayat: ग्रामसभेलाच प्रशासकांची दांडी

नेरळ ग्रामस्थ संतप्त; कारवाईची मागणी

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेरळ ग्रामपंचायतीची ग्रामसभा गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. मात्र, ग्रामसभेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायतीचे प्रशासक सुजित धनगर हेच गैरहजर राहिल्याने ग्रामसभा रद्द करण्याची वेळ आली. त्यामुळे उपस्थित ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, प्रशासकांनी ग्रामस्थांची फसवणूक केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यभर ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार नेरळ ग्रामपंचायतीचीही ग्रामसभा बोलावण्यात आली होती. यासाठी आठ दिवसांपूर्वी अजेंडा प्रसिद्ध करून ग्रामस्थांना सूचना देण्यात आल्या होत्या. ग्रामसभा सुरू होण्यापूर्वीच मोठ्या संख्येने ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयातील सभागृहात दाखल झाले होते. कर्जत पंचायत समिती सदस्य भगवान चंचे तसेच माजी सदस्य सुगावेकर यांचीही उपस्थिती होती. ग्रामपंचायत अधिकारी अरुण कार्ले हे नियोजित वेळेत उपस्थित राहिले होते.

गेल्या काही महिन्यांपासून विविध कारणांमुळे तहकूब होत असलेल्या ग्रामसभेची ग्रामस्थ आतुरतेने वाट पाहात होते. सभेसाठी आवश्यक कोरमही पूर्ण झाला होता. त्यामुळे गावातील रस्ते, गटारे, पाणीपुरवठा, वीज, स्ट्रीट लाईट, रखडलेली नळपाणी योजना आणि इतर प्रलंबित प्रश्नांवर चर्चा होऊन त्यावर मार्ग निघेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांना होती.

मात्र, तब्बल तासभर प्रतीक्षा करूनही प्रशासक सुजित धनगर ग्रामसभेसाठी उपस्थित न राहिल्याने अखेर सभा रद्द करण्यात आली. ग्रामसभेचे अध्यक्षच गैरहजर राहिल्याने उपस्थित ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. कडक उन्हात उपस्थित राहिलेल्या ज्येष्ठ नागरिकांनीही प्रशासनाच्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
वारंवार ग्रामसभा तहकूब होणे आणि यावेळी प्रशासक गैरहजर राहिल्याने ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रशासकांना निलंबित करून लवकरात लवकर ग्रामसभा घेण्यात यावी आणि गावातील रखडलेले प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी ग्रामस्थ गोरख शेप यांनी केली. तसेच या प्रकाराबाबत रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

Exit mobile version