। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील ज्येष्ठ वकील आणि आपल्या शरीर यष्टीने अनेक स्पर्धा विक्रम करणारे अॅड. गजानन पालू डुकरे यांनी राज्यस्तरीय खेलो मास्टर्स गेममध्ये तीन पदकांना गवसणी घातली. वयाच्या 49व्या वर्षी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झालेले गजानन डुकरे यांनी हातोडा फेक,गोळा फेक आणि थाळी फेक या तिन्ही स्पर्धेत तीन पदके मिळवून राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली निवड नक्की केली आहे. अॅड. डुकरे हे जागतिक विक्रम करणारे सायकलपटू असून त्यांच्या नावावर सायकल चालविण्याचे अनेक विक्रम प्रस्थापित आहेत.
कर्जत येथील दिवाणी न्यायालयात वकिली करणारे अॅड. गजानन डुकरे यांनी नेरळ ते माथेरान असा सायकल प्रवास करताना घाट रस्त्यात सायकल चालविली असून पाय न टेकता अखंडित सायकल चालविण्याचा विक्रम त्यांच्या नावे आहे. त्याचवेळी 100 किलोमीटरपर्यंत सायकल चालविण्याचे अनेक विक्रम अॅड. डुकरे यांच्या नावे आहेत. वयाच्या 49व्या वर्षी अॅड. डुकरे यांनी नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय मास्टर्स गेममध्ये सहभाग घेतला. 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीत झालेल्या राज्यस्तरीय गेममध्ये अॅड. डुकरे यांनी हातोडा फेक, थाळी फेक आणि गोळा फेक या तीन स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. त्यातील हातोडा फेकमध्ये अॅड. डुकरे यांनी प्रथम क्रमांक मिळविला, तर थाळी फेकमध्ये दुसरा आणि गोळा फेकमध्ये तिसरा क्रमांक पटकावला.या तिन्ही स्पर्धांमध्ये अॅड. गजानन डुकरे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
खेलो मास्टर्स गेममध्ये अॅड.गजानन डुकरेंची तीन पदकांना गवसणी
