निवडणुकांनंतर धान्यांचे भाव कडाडणार

। रायगड । प्रतिनिधी ।

महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यांमध्ये साखर, तूरडाळी पाठोपाठ उडीद, हरभरा आणि मसूर या डाळींच्या किमती वाढलेल्या स्थितीत स्थिरावलेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचा रोष ओढवण्याची चिंता सरकारला सतावत आहे. अन्नधान्याची दरवाढ रोखण्यासाठी व्यापार्‍यांना आठवड्याचा साठा जाहीर करण्याचे निर्देश दिले गेले आहेत. सर्व प्रकारच्या खाद्यान्नाचे दर नियंत्रणात राहावेत म्हणून केंद्र सरकारकडून लोकसभा निवडणुकीदरम्यान उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, निवडणूक संपताच सर्वच खाद्यान्नाचे भाव कडाडण्याचे संकेत मिळत आहेत.

लोकसभेचे चार टप्पे पूर्ण झाले आहेत. सोमवारी पाचवा टप्पा असून अजून निवडणुकीचे दोन टप्पे शिल्लक आहेत. यंदा कोणतीही लाट नसल्याने विद्यमान सरकारने महागाई वाढू नये म्हणून व्यापार्‍यांवर साठ्याची माहिती देण्याचे निर्बंध लादले आहेत. बाजारातही सध्या उन्हाळी सुटीमुळे अनेक जण पर्यटनाला गेलेले आहे. तसेच आंबेही मोठ्या प्रमाणात बाजारात आल्याने ग्राहकांची धान्य बाजारातील गर्दी कमी झालेली आहे. परिणामी, सर्वच धान्यांचे भाव वाढलेल्या स्थितीत स्थिरावलेले आहेत. ही स्थिरता निवडणुकीचे निकाल लागताच संपेल. निवडणुकीचे निकाल काहीही असोत यंदा उत्पादनच कमी असल्याने डाळी, तांदूळ, साखर, गव्हासह इतरही धान्याचे भाव प्रतिकिलो दोन ते सात रुपयांनी वाढण्याचे संकेत मिळत आहेत.

यंदा पावसाने दडी दिल्यामुळे पाणीटंचाई आणि इतरही समस्यांचा सामना करावा लागत आहे. सोबतच अवकाळी पावसाने धान्यपिकांचे नुकसान होत आहे. हीच अस्थिरता ग्राहकांची चिंता वाढवणारी आहे. कारण यंदा अवकाळी पावसामुळे डाळींसह इतरही धान्यांचे भाव वाढलेले आहेत.

Exit mobile version