आगरदांडा बंदराला विकासाची प्रतीक्षा

। आगरदांडा । प्रतिनिधी ।

सुमारे 2700 हजार कोटी रुपये खर्च करून श्रीवर्धन तालुक्यातील दिघी व मुरुड तालुक्यातील आगरदांडा याठिकाणी दोन मोठे बंदर विकसित करण्याचे काम चालू झाले. सरकारने त्यावेळेला बीओटी तत्त्वावरती हा प्रोजेक्ट विजय कलंत्री यांना चालवायला दिले होते. परंतु 9 वर्षात जेवढी कामे पाहिजे ती विजय कलंत्री यांच्याकडुन झाली नाही.त्यामुळे या प्रोजेक्टला ब्रेक लागला.

तीन वर्षांनी हे काम अदानी समुहाला देण्यात आले. आणि बंदराचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. यापैकी दिघी येथे बंदर विकसित झाले असून या प्रकल्पाचा पहिला, दुसरा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला असून परंतु मुरुड तालुक्यातील आगरदांडा येथील बंदराच्या विकास झाला नसल्याने या आगरदांडा बंदराला वेग कधी येणार असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

गेली पंधरा वर्षांपासून आगरदांडा बंदर विकसित होत नसल्याने स्थानिकांना रोजगार मिळू शकला नाही. शेकडो तरुण रोजगाराच्या प्रतिक्षेत आहेत. बंदराच्या विकासापूर्वी या ठिकाणी मोठी रेलचेल दिसून येत होती. आगरदांडा बंदर सुरू न झाल्याने बेरोजगारीचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. दिघी प्रमाणे आगरदांडा बंदर सुरू झाला तर स्थानिकांच्या बेरोजगारीचा प्रश्‍न सुटेल विविध उद्योगधंद्यांना चालना मिळाली असती. पोर्टला आवश्यक असणारा आगरदांडा ते इंदापूर हा चौपदरी रस्ता तयार झाला. आगरदांडा ते रोहा रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाली तरी ही आगरदांडा बंदर विकासला वेग येताना दिसत नाही. रायगड जिल्ह्यातील दिघी बंदर औद्योगिक क्षेत्र उभारणीवर शिक्कामोर्तब केले आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांची निधीची तरतूद केली आहे. आगरदांडा बंदराकडे कानाडोळा न करता हे बंदर कसे विकसित होईल याकडे अदानी समुहाने लक्ष देणे गरजेचे आहे.

Exit mobile version