शासनाकडून 65 शेतकऱ्यांना नोटीसा
| आगरदांडा | प्रतिनिधी |
सुमारे 27,000 हजार कोटींचा प्रकल्प मुरुड तालुक्यातील आगरदांडा व श्रीवर्धन तालुक्यातील दिघी याठिकाणी येथे दोन मोठे बंदर विकसित करण्यात येत आहे. दिघी येथील बंदर विकसित झाले असून, बंदरात बोटीमार्गे येणारा कच्चा माल नियोजित ठिकाणी नेण्यासाठी रेल्वे मालगाडी आवश्यकता असल्याने आगरदांडा ग्रामपंचायत परिसरातील जागेवर रेल्वे ट्रॅकची अधिकृत रेखाटणी केली गेली आहे.
रेल्वे मार्गासाठी लागणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनासाठी ज्याच्या जमिनी जाणार आहेत, त्यांना महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 यांच्या कलम 32 (2) खालील व्यक्तिगत नोटिसा उपविभागीय अधिकारी अलिबाग यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. अदानी पोर्टर ॲण्ड लॉजिस्टीक पार्क कंपनीकरिता रोहा जंक्शन ते आगरदांडा पोर्ट रेल्वे लाईनकरिता तालुक्यातील उसडी, आगरदांडा, नांदले व हाफीजखार या गावांतील 65 जणांची 1764.73 हेक्टर जमीन जाणार असून, त्यांना दि. 27 जुलै 2023 रोजी नोटिसा देण्यात आल्या आहेत. याबाबत व्यक्तिगत सुनावणी करण्याची इच्छा असेल तर आपणास या नोटिशीच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत भेटीची वेळ ठरुन कोणत्याही कामाच्या दिवशी सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत खाली सही करणाऱ्या पुढे जातीने किंवा आपल्या कायदेशीर मुखत्यारामार्फत हजर राहता येणार, अशी माहिती उपविभागीय अधिकारी अलिबाग यांनी नोटीसमध्ये नमूद केले आहे. आगरदांडा ग्रामपंचायत परिसरातून मालगाडी रेल्वे येत असल्याने पंचक्रोशी भागातील व मुरुड शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलं असलं तरी शेतकरी संभ्रमात आहेत.