| माणगाव | प्रतिनिधी |
अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघातर्फे जुनी पेन्शन मागणीकरिता संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र खाडे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी चेतनादिनानिमित्त तहसीलदार कार्यालय कार्यालयाबाहेर भोजन सुट्टीत निदर्शने करण्यात आली. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्रात राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी, जि.प. कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच नगरपालिका, ग्रामपंचायत कर्मचारी समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते.
यावेळी सर्वाना जुनी पेन्शन योजना लागू करावी, पीएफआरडीए कायदा रद्द करा, आठवा वेतन आयोगाचे गठन करा, सर्व विभागातील रिक्त पदे कायमस्वरुपी भरा, कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करा, खासगीकरण, कंत्राटीकरण धोरण रद्द करा, कामगार कायद्यात केलेल्या सुधारणा तात्काळ मागे घ्या, नवीन शैक्षणिक धोरणाचा पुनर्विचार करा, इत्यादी मागण्यांकरिता ही बाईक रॅली काढण्यात आली होती. हे आंदोलन प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत करण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा समन्वय समिती जिल्हाध्यक्ष सुरेश पालकर, महसूल संघटनेचे जितेंद्र टेंबे, जे.एम. मुकणे, तृप्ती पवार, भारती पाटील, बुद्धकोश पवार, बाळा भोनकर, तलाठी संघटना श्री. मोराळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.