आदिवासींच्या हक्कांसाठी चक्का जाम

। पालघर । प्रतिनिधी ।

नाशिक येथे गेल्या पंधरा दिवसांपासून 17 संवर्गातील पेसा भरती शासनाने करावी यासाठी आदिवासी तरुणांनी शासनाच्या विरोधात एल्गार पुकारलेला आहे. या आदिवासी तरुणांना पाठिंबा दर्शविण्यासाठी मोखाडा आदिवासी समाज संघर्ष समितीकडून मोखाडा आणि खोडाळा बाजारपेठ बंदची हाक देण्यात आली होती. तसेच, बिरसा मुंडा चौफुली येथे चक्का जाम आंदोलनसुद्धा करण्यात आले होते.

नाशिक येथे आमरण उपोषणाला बसलेल्या सर्व पेसा क्षेत्रातील उमेदवारांना शासनाद्वारे नियुक्ती पत्र द्यावे, राज्य पेसा कक्षात 50 टक्के आदिवासी कर्मचार्‍यांची तात्काळ नियुक्ती करावी, नवीन पेसा गाव निर्मितीची प्रक्रिया गतिमान करावी यासह पेसाचा 5 टक्के निधी खर्च न करणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करावी आदी मागण्या घेऊन आदिवासी समाज संघर्ष समिती व तालुक्यातील ग्रामस्थांकडून चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनातील आदिवासी बांधवांना संबोधित करताना जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी सांगितले की, आपण केवळ 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनी एकत्र न येता आपल्या आदिवासी बांधवांवर जेथे अन्याय होईल तेथे एक जुटीने उभे राहिले पाहिजे.

यावेळी उपनगराध्यक्ष नवसु दिघा, प्रा.शिक्षक भांगरे, सरपंच प्रकाश भोंडवे तसेच अनेक आदिवासी तरुणांनी उपस्थित नागरिकांना भाषणातून आपले हक्क, अधिकार याविषयी संबोधित केले आणि अखेर सकाळी 9 वाजता बिरसा मुंडा चौफुली येथे सुरू केलेले चक्का जाम आंदोलन दुपारी 12 वाजता प्रशासनाच्या मध्यस्थीमुळे मागे घेण्यात आले.

Exit mobile version