| नागोठणे | वार्ताहर |
मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरुन रायगडातील पत्रकार संघटना पुन्हा एकदा महामार्गावर उतरून बोंबाबोंब करणारे अनोखे आंदोलन करणार आहेत. रायगड प्रेस क्लबतर्फे 9 ऑगस्ट या क्रांतीदिनी ज्येष्ठ पत्रकार एस.एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वाकण नाका ते कासू दरम्यानच्या महामार्गावर आगळेवेगळे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनास मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर आदि उपस्थित राहणार आहेत.
या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनच्या वतीने नागोठण्यात रविवारी (दि.30) सकाळी करण्यात आले होते. बैठकीला मनोज खांबे, अनिल मोरे, संजय मोहिते, दर्वेश पालकर, विजय मोकल, पद्माकर उभारे, निशांत पवार, संजय भुवड, कमलेश ठाकूर, सदस्य गौतम जाधव, शामकांत नेरपगार, ॲड. महेश पवार, अनिल पवार, विनोद भोईर, रवींद्रनाथ ओव्हाळ, कमलेश सुतार, ॲड. सुशील गायकवाड, अजय गायकवाड आदि यावेळी उपस्थित होते.
सद्यस्थितीत तर या महामार्गाची महाकाय खड्ड्यांमुळे भयानक दुरावस्था झाली असून महामार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये वाहने अडकून पडून दररोज अपघात होत आहेत व वाहनांची तोडमोडही होत आहे. मात्र असे असूनही राष्ट्रीय महामार्ग विभाग या रस्त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आंदोलन करण्याचा निर्णय रायगड प्रेस क्लबकडून घेण्यात आला आहे.