अग्निवीर महिलेची आत्‍महत्‍या

| मुंबई | वृत्तसंस्था ।

अग्निवीरचे प्रशिक्षण घेणाऱ्या एका 20 वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईमध्ये एका वसतीगृहात महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. महिला केरळची रहिवाशी असून नेव्हीचे प्रशिक्षण घेण्यासाठी ती दोन आठवड्यापूर्वी मुंबईमध्ये आली होती.

सोमवारी सकाळी महिला आणि तिच्या प्रियकरामध्ये भांडण झाले होते. प्रियकराने स्वत:ला संपवण्याची धमकी दिली होती. त्यानंतर महिलेने आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, आत्महत्येमागे अन्य कारण आहे का, याबाबत पोलिस तपास करत आहेत. मालाड वेस्टमधील आएएनएस हमला बेसमधील रुममध्ये तिचा मृतदेह आढळून आला आहे.

महिला रुममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केलं. मालवणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून याप्रकरणी तपास सुरु केला आहे. कुटुंबीय आणि वसतीगृहातील मैत्रिणींची चौकशी केली जात आहे. महिलेजवळ सुसाईट नोट आढळून आलेली नाही.

दरम्यान, अग्निवीर योजनेंतर्गत अग्निवीर जवानांना चार वर्षे सेवा देण्याची संधी दिली जाते. यामध्ये सहा महिन्यांचे प्रशिक्षण आणि साडेतीन वर्षांची प्रत्यक्ष सेवा याचा समावेश असतो. यानंतर अग्निवीर लष्करी सेवेमध्ये पूर्णकालीन सेवेसाठी अर्ज करु शकतात.

Exit mobile version