भात, नाचणी क्षेत्राचा विस्तार करण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
जिल्ह्यातील नाचणी व भात पिक लागवडीचे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी सेवकाची मदत घेतली जाणार आहे. त्यांना एक गाव दत्तक देऊन या क्षेत्राचा विस्तार करण्याचा प्रयत्न कृषी विभागामार्फत केला जाणार आहे.
जिल्ह्यामध्ये भाताचे क्षेत्र 95 हजार हेक्टर इतके असून नाचणीचे क्षेत्र दोन हजार 400 हेक्टर इतके आहे. 95 टक्केपेक्षा अधिक शेतकरी पावसावर अवलंबून असलेल्या पाण्यावर शेती करतात. भाताबरोबरच डोंगर व सपाट जागेमध्ये नाचणीची लागवड केली जाते. कमी उत्पादन मिळत असल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी भात लागवडीकडे दुर्लक्ष करीत आहेत. खर्च अधिक व उत्पन्न कमी अशी परिस्थिती असल्याने भात लागवडीचे क्षेत्र कमी होऊ लागले आहे. नाचणीची लागवड आदिवासी ठाकूर समाज मोठ्या प्रमाणात करतात. नाचणीच्या लागवडीचे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी विभागामार्फत गेल्या अनेक वर्षापासून नाचणी तथा नागलीचे बी वाटप केले जाते. या क्षेत्रात अधिक वाढ करण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी कृषी सेवकाची मदत घेतली जाणार आहे. खरीप हंगामातील भातपिकासाठी 81 हजार 335 हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात आले असून दोन हजार 995 किलोग्रॅम/हेक्टर उत्पादनाचे लक्ष आहे. तसेच, नाचणी पिकासाठी दोन हजार 550 हेक्टर क्षेत्रावरील नियोजन असून एक हजार 260 किलोग्रॅम/हेक्टर उत्पादनाचे लक्ष आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या आदेशानुसार हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील कृषी विभाग कामाला लागले आहे.
रायगड जिल्ह्यातील गावांची संख्या एक हजार 800हून अधिक आहे. जिल्ह्यात 260हून अधिक कृषी सेवक आहेत. या कृषी सेवकांकडे एक गाव दत्तक म्हणून दिले जाणार आहे. त्यांच्या माध्यमातून गावागावात भात व नागली तथा नाचणी पिकांचे महत्त्व, त्यातून मिळणारे आर्थिक बळ याबाबत माहिती दिली जाणार आहे. भात व नाचणी लागवडीच्या क्षेत्रात वाढ करण्यासाठी प्रचार केला जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात भात व नाचणी पिकाचे क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे.
फार्महाऊसमध्ये होणार नाचणीची लागवड
सर्व तालुका कृषी अधिकारी यांनी जिल्ह्यातील फार्म हाऊस धारकांना किमान एक पीक लागवड करण्याचे आवाहन करावे व त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल याची दक्षता घ्यावी असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील फार्महाऊसमध्ये नाचणी या पिकाची लागवड केली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. त्यामुळे आता फार्म हाऊसचा परिसर नाचणी पिकांनी फुलणार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये गतवर्षी दोन हजार 400 हेक्टर क्षेत्रामध्ये नाचणीची लागवड करण्यात आली होती. यंदा या क्षेत्रामध्ये 150 हेक्टरने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दोन हजार 550 हेक्टर क्षेत्रामध्ये नाचणीची लागवड केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.