। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील कोथळीगडच्या पायथ्याशी असलेल्या पेठ गावामधील एका शेतकर्याच्या विहिरीमध्ये पडून बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. रात्रीच्या वेळी अंधारात भक्ष्याच्या शोधात असताना हा बिबट्याचा विहिरीमध्ये पडला असून त्याच्या उडी मारताना बिबट्याचे डोके दगडावर आदळल्याने हा अपघात घडला.
कोथळीगड किल्ल्यांच्या पायथ्याशी पेठ गाव आहे. हा परिसर घनदाट जंगल भागाचा असल्याने या भागात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे यापूर्वी आढळून आले आहे. तेथील ग्रामस्थ संजय सखाराम सावंत यांनी आपल्या विहीरीत बिबट्या मृत अवस्थेत पडल्याची माहिती वन कर्मचार्याला दिली. त्यावेळी धामणी येथील वनपाल यांनी तात्काळ ही माहिती कर्जत पूर्वचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांना दिली असता वनक्षेत्रपाल चव्हाण यांनी घटनेची माहीती पनवेल सहायक वनसंरक्षक आणि अलिबाग येथील उपवनसंरक्षक यांना माहीती दिली. त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. मृत बिबट्या हा भक्ष्याच्या शोधात रात्रीच्या अंधारात विहिरीत पडला असून बिबट्याचे डोके विहिरीतील खडकावर आदळल्याने गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
त्यानंतर ओवल फाऊंडेशन आणि यशवंती हॅकर्स यांच्या ट्रेकर्स यांना वन विभागाने पाचारण केले आणि त्यांच्या माध्यमातून मृत बिबट्याला विहिरीतील बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मृत बिबट्याला पिंगळस येथील पशुवैदयकीय अधिकारी दवाखाना येथे शव विच्छेदन करण्यासाठी नेण्यात आला. मृत बिबट्या हा नर जातीचा असून, त्याचे वय साधारण तीन वर्षे असल्याचे स्पष्ट झाले.