विद्यार्थी, नागरिकांसह व्यावसायिक हैराण
ऑनलाइन कामकाजावर परिणाम
| कोलाड | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील कोलाड परिसरात एअरटेलचे मोबाईल नेटवर्क तसेच इंटरनेट सेवा वारंवार बंद पडत आहे. याचा मोठा फटका नागरिक, विद्यार्थी, व्यापारी तसेच ऑनलाइन काम करणाऱ्या नागरिकांना बसत असून नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
एअरटेलचे रिचार्ज सर्वात महाग असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. परंतु, बहुतेक ग्राहकांकडे एअरटेलचे सिम कार्ड आहे. याचे मुख्य कारण एअरटेल ग्राहकांना देशाच्या कोणत्याही भागात गेलो तरी नेटवर्कचा प्रश्न भासत नव्हता; परंतु काही दिवसापासून एअरटेल नेटवर्कसेवेचे तिनतेरा वाजलेले दिसत आहेत, तर गेली दोन दिवस एअरटेलचे नेटवर्क पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे एअरटेल ग्राहकांचे सर्व ऑनलाइन व्यवहार बंद झाल्यामुळे ग्राहकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
कोलाड परिसरातील अनेक भागांमध्ये मोबाईलला नेटवर्क न मिळणे, कॉल न लागणे, कॉल मध्येच कट होणे तसेच इंटरनेट पूर्णपणे बंद होण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यास, प्रकल्प सादर करणे तसेच विविध शैक्षणिक कामांसाठी इंटरनेटची गरज असताना नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. तसेच व्यापारी वर्गालाही व्यवहार, ऑनलाइन पेमेंट आणि इतर डिजिटल सेवा ठप्प झाल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. एअरटेल कंपनीने या समस्येची तात्काळ दखल घेऊन नेटवर्क सेवा पूर्ववत करावी. तसेच कोलाड परिसरातील नेटवर्क क्षमता वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
