अलिबाग तहसील कार्यालयाचा अजब कारभार
। अलिबाग । प्रतिनिधी ।
शैक्षणिक कामांसह इतर कामांसाठी बाँन्डची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी प्रतिज्ञापत्र नोंदणीची लगबगदेखील वाढली आहे. मात्र नोंदणीसाठी नेमलेले कर्मचारी जागेवर नसल्याने अन्य त्याच दर्जाच्या कर्मचार्यांकडे नोंदणीची मागणी केल्यावर त्यांच्याकडून सर्वसामान्यांची अवेहलना होत, असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. निवडणूकीची कामे करीत असताना सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडेही तहसील कार्यालयांतील कर्मचार्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
दहावी, बारावीची परीक्षा संपल्यानंतर पुढील शिक्षणासाठी लागणारे उत्पन्नाचे दाखले, नॉनक्रिमिलेअर, जातीचे दाखले अशा अनेक प्रकारची दाखले काढण्यासाठी पालकांसह विद्यार्थ्यांची तहसील, उपविभागीय अधिकारी कार्यालयात गर्दी वाढू लागली आहे. दहावी, बारावीचा निकाल कधीही जाहीर होऊ शकतो. त्या अगोदर सर्व कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी पालक व विद्यार्थी कामाला लागले आहेत. त्यात वेगवेगळ्या कर्जासाठी व अन्य शासकिय कामासाठी बॉन्डची मोठ्या प्रमाणात गरज आहे. त्यात शंभर रुपयांच्या बॉन्डला प्रचंड मागणी वाढली आहे. बाँन्ड घेण्यासाठी तहसील कार्यालयत मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे. प्रतिज्ञापत्र तयार केल्यावर त्याची नोंदणी करण्यासाठी अव्वल कारकून, अथवा नायब तहसीलदार यांच्याकडे धावाधाव सुरु आहे. मात्र नोंदणीसाठी नेमलेले अधिकारी, कर्मचारी निवडणूकीच्या कामात व्यस्त आहेत. त्याचा परिणाम प्रतिज्ञापत्र नोंदणीसाठी सर्वसामान्यांची फरपट होत आहे. अलिबाग तहसील कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचार्यांकडूनदेखील योग्य वागणूक दिली जात नाही.
निवडणूकीच्या कामात व्यस्त असलेल्या अधिकारी, कर्मचार्यांऐवजी कार्यालयत कार्यरत असलेले अधिकारी कर्मचार्यांकडून प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी देण्यास टाळाटाळ होत आहे. नोंदणीसाठी त्यांची धावाधाव होत आहे. याकडे तहसीलदार विक्रम पाटील यांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. प्रतिज्ञापत्रावर सही घेण्यासाठी कार्यालयात येणारी नागरिक हा मतदार आहे, याचे भान प्रशासनाने कायम ठेवणे आवश्यक आहे.या नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र त्यात नागरिकांना चांगली वागणूक तहसील कार्यालयात दिली जात नाही, ही मोठी खंत नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
शासकिय कामासाठी प्रतिज्ञा पत्रावर अधिकारी व कर्मचार्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी तहसील कार्यालयात गेलो. मात्र त्याठिकाणी नेमलेले अधिकारी व कर्मचारी निवडणूकीच्या कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यांच्या जागी दुसर्या अधिकारी, कर्मचार्यांची विचारपूस केली असता, संबंधितांकडून योग्य माहिती देण्यात आली नाही. नागरिकांना चांगली वागणूक मिळावी हीच मागणी आहे.
सचिन पाटील
नागरिक
प्रतिज्ञा पत्रावर नोंदणी करण्यासाठी येणार्या प्रत्येक नागरिकांना चांगली वागणूक दिली पाहिजे. कार्यालयातील काही कर्मचार्यांकडून चुकीचा प्रकार होत असेल, तर त्यांना याबाबत सुचना करून नागरिकांना सहकार्य करण्याचे सांगण्यात येईल.
विक्रम पाटील
तहसीलदार,
अलिबाग
