| मुंबई | प्रतिनिधी |
सत्तेच्या साठीमारीत जनतेला, शेतकर्यांना न्याय द्या,अशी विनंती करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क वर्तविले जात आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी याबद्दल माहिती दिली. दादांनी राज्यासाठी चांगले काम करावे. इथे सत्तेची साठमारी चालली आहे त्यामध्ये राज्याचे तसेच मुळ शेतकरी आणि नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका, असे ते म्हणाले.
हा महाराष्ट्र आहे, धृतराष्ट्र नाही..
अजित पवारांबाबत सांगत शिवसेनेतून काही लोक बाहेर पडले होते. आता तेच त्यांच्यासह सत्तेत आहेत याबाबत विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले की, हे सगळं जनतेला समजत आहे. हा डोळे नसलेला धृतराष्ट्र नाही हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, या वाक्याचा पुनरुच्चारही उद्धव ठाकरेंनी केला. सरकार स्थापन झाल्यावर ‘नांदा सौख्य भरे’ या शुभेच्छा दिल्या आहेत.
दादांकडे तिजोरीच्या चाव्या
अजित पवारांनी अडीच वर्ष माझ्यासोबत काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्या स्वभावाची मला कल्पना आहे. इथे बाकीच्यांचे सत्तेसाठी काहीही डावपेच चालले असले तरी त्यांच्याकडून जनतेला योग्य मदत मिळेल. कारण राज्याच्या तिजोरीच्या चाव्या परत एकदा त्यांच्याकडे दिल्या गेल्या आहेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
दोन दिवस बंगळुरु येथे देशप्रेमी पक्षांची बैठक पार पडली. जी लोकशाही प्रेमी पक्षांची आघाडी स्थापन झाली आहे. ही लढाई व्यक्ती किंवा पक्षाविरोधात नसून हुकूमशाही विरोधात आहे. पण जो पायंडा पडतो आहे ते देशासाठी घातक आहे, त्यासाठी सर्व लोकशाहीप्रेमी पक्ष एकत्र येत आघाडी मजबूत निर्माण झाली आहे.
उद्धव ठाकरे,माजी मुख्यमंत्री