तळा बाजारपेठेत अळंबी दाखल

खवय्यांची उडाली झुंबड

| तळा | वार्ताहर |

दरवर्षी पावसाळा सुरू झाला की खवय्यांना आपसूकच अळंबीची आठवण येते. बाजारात विक्रीसाठी कधी अळंबी येते आणि ती कधी खरेदी करून खायला मिळते याची आतुरतेने हे खवय्ये वाट बघत असतात. मात्र यावर्षी अळंबीसाठी खवय्यांना जास्त प्रतीक्षा करावी लागली नाही. यावर्षी ही अळंबी लवकर आल्याने ती विक्रीसाठी बाजारात दाखल होताच खवय्यांची खरेदीसाठी एकच झुंबड उडाली.

अळंबी ही डोगंराळ भागात सागवानी झुडपात कुजलेल्या पालापाचोळा व माळरानावरसुद्धा आढळते. या अळंबीसाठी शेतकरी वर्ग सकाळी लवकर उठून माळरानावर अळंबीच्या शोधात फिरत असतात. अळंबी सकाळी पहाटे कळ्या स्वरुपात, तर दुपारी ती फुललेली आढळते. अळंबी ही चविष्ट व रुचकर अशी रानभाजी म्हणुन लोक आवडीने खातात. शहरातील नागरिकांमधूनसुद्धा अळंबीला मोठी मागणी असते. आदीवासी महिला अळंबी बाजारात विक्रीसाठी आणताच शहरातील नागरिक आहे ती किंमत मोजून त्यांच्याकडुन विकत घेतात. अळंबीचा वाटा हा 50 रुपये लावला जातो. त्यांचे वजन साधारण 100 ते 150 ग्रॅम असते. आदीवासी भगिनी मोठ्या प्रमाणात या अळंबी विक्री करून पैसे मिळवितात व या पैशातूनच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितात.

Exit mobile version