| माथेरान | प्रतिनिधी |
जंगलात उगवणारी अळंबी हे माथेरानच्या पहिल्या पावसाचे प्रमुख वैशिष्ट्य. सुरुवातीला पावसाचे आगमन झाले की पुढील दोन ते तीन आठवडे येथील माथेरानच्या जंगलात निसर्गाचे देणे असलेली अळंबी नजरेस पडते.
माथेरानमध्ये पहिला पावसाळा सुरू झाला की येथील जंगल परिसरात पडलेल्या पालापाचोळ्यांमध्ये पांढरी शुभ्र अळंबी उगवते. या पांढर्या शुभ्र रंगाच्या व अत्यंत छोट्या छत्रीच्या आकाराच्या अळंबीची चवही येथील सर्वच आबालवृद्धांच्या जिभेवर रेंगाळत राहते. काही तज्ज्ञांच्या मते, अळंबी ही हरितद्रव्यविरहित बीज धारण करणारी बुरशी आहे. या अळंबीस भूछत्र असेही म्हणतात. तर, पुरातन काळापासून संस्कृतमध्ये कुसूंप व पौराणिक ग्रंथात भूछत्र म्हणून अळंबीचा उल्लेख आढळतो, तसेच अळंबीविषयी कुत्र्याची छत्री अशी एक चुकीची कल्पना अजूनही लोकांच्या मनात आहे.
अळंबीचे काही विषारी प्रकार वगळता हा शक्तिवर्धक आणि औषधी आहार आहे. सुरुवातीच्या पहिल्या पावसात कचर्याच्या ढिगार्यावर, कुजणार्या पालापाचोळ्यावर, झाडाखाली तसेच झाडाच्या बुंध्यावर अळंबी उगवते त्याचप्रमाणे तिचे नानाविध प्रकार आहेत. अनेकदा विषारी अळंबीदेखील आढळून येते. डोंगर माथ्यावरील माथेरानच्या जंगलात व पावसाळी पहिल्या हंगामात आढळणारी अळंबी म्हणजे येथील सर्वच खवय्यांसाठी मेजवानीच असते व दाट जंगलात ती उगवते. अळंबीचे फुल पूर्ण उमलण्यापूर्वी कळीची अळंबी विशेष चवीची असते. आत्ता या पावसाळ्याच्या सुरुवातीला माथेरानमधील बहुतांश घरात अळंबीचा बेत हमखास असतो.
अळंबी उगविण्याची प्रक्रिया सुरू होताना अगोदर पालापाचोळ्यात बारीक तुरा असतो, नंतर त्याची अंडी तयार होतात व त्यानंतरची प्रक्रिया म्हणजे अळंबीचे बारीक कळ्यांमध्ये रूपांतर होते. ज्याने एकदा अळंबी खाल्ली तो पुढल्यावर्षी हमखास अळंबीची वाट पाहत असतो.
– नूर मोहम्मद शेख, स्थानिक रहिवासी