जिल्ह्यातील वेगवेगळ्या आगारात उत्साहाचे वातावरण
। अलिबाग । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा 77 वा वर्धापन दिन रविवारी (दि.01) रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या आगारात साजरा करण्यात आला. काही ठिकाणी केक कापून तर काही ठिकाणी प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन हा दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने अलिबाग एसटी बस आगारात प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन तसेच केक कापून एक आगळ्यावेगळ्या पध्दतीने हा सोहळा साजरा करण्यात आला. एसटी महामंडळ रायगड विभागाचे वाहतूक अधिकारी प्रशांत खरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्धापन दिन साजरा झाला.

यावेळी अलिबाग एसटी बस आगारातील व्यवस्थापक चेतन देवधर, राकेश देवरे, स्थानक प्रमुख अभिजीत मांढरे, वाहतूक निरीक्षक, कार्यशाळा विभागाचे अधिकारी कर्मचारी, चालक, वाहक व महिला कर्मचारी, प्रवासी उपस्थित होते.
एसटी महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त अलिबाग एसटी बस आगारात उत्साहाचे वातावरण दिसून आले होते. जिल्हयातील अलिबाग, पेण, रोहा, माणगाव, श्रीवर्धन, महाड, मुरूड, कर्जत या आगारात वेगवेगळ्या पध्दतीने कार्यक्रम घेण्यात आला. संपूर्ण आगारासह स्थानकाचे परिसर सुशोभीत करण्यात आले.
अलिबाग एसटी बस आगारात सकाळी रांगोळी काढण्यात आली. त्यानंतर पंढपूरला जाणार्या एसटी बसला फुलांनी सजविण्यात आले. एसटी बसची पुजा करण्यात आली. ठिकठिकाणी फुलांच्या माळा लावून परिसर सुशोभीत केले. त्यानंतर प्रवाशांच्या हस्ते केक कापून वर्धापन दिन साजरा केला.
विभागीय वाहतूक अधिकारी प्रशांत खरे, आगार व्यवस्थापक राकेश देवरे, चेतन देवधर तसेच महिला कर्मचारी यांच्या हस्ते प्रवाशांना गुलाब पुष्प व पेढे देऊन एसटी महामंडळाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
ग्रामीण भागातील प्रत्येक घटकाला एसटीने सेवा दिली आहे. त्यामध्ये अधिकार्यांसह चालक, वाहक, मॅकेनिक यांची महत्वाची भुमिका ठरली आहे. त्यामुळे स्पर्धेच्या युगात आजही एसटी बसला प्रचंड मागणी आहे. शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिक, महिला अशा सर्वच क्षेत्रातील मंडळी एसटीतून प्रवास करीत आहेत. त्यामुळे अलिबाग एसटी बस आगारामार्फत करण्यात आलेल्या कार्यक्रमाला अनेकांनी शुभेच्छा दिल्या. काहींनी सोशल मिडीयाद्वारे तर काहींनी प्रत्यक्ष भेटून एसटीच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

मुरुडमध्ये वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रायगड विभागीय वाहतूक शाखेच्या अधिक्षक मनीषा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आगार प्रमुख राहुल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड आगारात राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. मुरुड वाहतूक नियंत्रण कक्षात वर्धापन दिनानिमित्त आकर्षक रांगोळी व सजावट करण्यात आली होती. यावेळी सहाय्यक वाहतूक निरीक्षक कृष्णा म्हात्रे, सुनील हासे, संदीप सानप, आगार प्रमुख राहुल शिंदे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक संजय भोकरे, चालक, वाहक व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
पेण आगारात वर्धापन दिन उत्साहात साजरा
एसटीचा 77वा वर्धापन दिन पेण आगारात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. रात्रीपासूनच आकर्षक रोषणाईने पेण आगार सजले होते. शेकडो एसटी प्रवाशांच्या साक्षीने पेण तालुक्यातील ज्येष्ठ प्रवासी विलास पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला एसटी कामगार संघटनेचे पेण आगार सचिव बी.एम. बांगर, कोषाध्यक्ष आशा घोलप व समस्त पेण आगारातील कर्मचारी वृंद उपस्थित होता.