आय्यान क्लब आयोजित क्रिकेट स्पर्धेत आलिया इलेव्हन सुपर सिलेक्टर संघ विजयी

। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव येथील आय्यान क्रिकेट क्लब आयोजित लोकनेते अशोक साबळे स्मृतिचषक मर्यादित षटकांच्या टेनिस ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत आलिया इलेव्हन सुपर सिलेक्टर माणगाव संघाने झुंजार खेळाचे प्रदर्शन दाखवित चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात रॉयल क्रिकेट क्लब रोहा संघाचा पराभव करीत प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले.
या स्पर्धेत आलिया इलेव्हन सुपर सिलेक्टर माणगाव संघाच्या सर्वच खेळाडूंनी विशेष चमक दाखविली. त्यांना रोख रुपये 44 हजार 444 व आकर्षक अशोक साबळे स्मृतिचषक देऊन राजिपचे माजी आरोग्य व शिक्षण समिती सभापती राजीव साबळे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. सदर बक्षीस वितरण समारंभाला उद्योजक प्रसाद धारिया, सिराज परदेशी, अकबर परदेशी, लियाकत परदेशी, माजी उपसरपंच राजेश मेहता, माणगाव क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष फहद करबेलकर, मयूर शेठ, बबन रातवडकर, दिनेश रातवडकर, इरफान हाजिते आदी मान्यवर उपस्थित होते. सदर स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील नामवंत अशा 32 संघानी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत उपविजेते ठरलेले रॉयल क्रिकेट क्लब रोहा संघास रोख रुपये 22 हजार 222 व आकर्षक चषक, तृतीय क्रमांकाचे विजेते स्कॉर्पियन्स कुवेत साई ता.माणगाव संघास रोख रुपये 11 हजार 111 व आकर्षक चषक तर चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरलेले वाकडाई इलेव्हन उतेखोल-माणगाव संघास रोख रुपये 7 हजार 777 व आकर्षक चषक तसेच इतर वैयक्तिक बक्षिसांमध्ये उत्कृष्ट फलंदाज सुफियान सिद्धिक, उत्कृष्ट गोलंदाज सुरज टेंबे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अबुझर दळवी, अंतिम सामन्यातील सामनावीर आदिल गजगे तर मालिकावीर सलमान सिद्धिक यांची निवड करण्यात आली. या सर्वांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version