अलिबाग नगरपरिषदेचे आरक्षण जाहीर

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकांच्या दृष्टीने आज आरक्षणाची सोडत आज काढण्यात आली. वाढलेल्या जागांनुसार 20 पैकी 10 जागांवर महिलासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. तर 10 जागा या सर्वसाधारण म्हणजेच खुल्या असणार आहेत. अलिबागवर शेतकरी कामगार पक्षाची एकहाती सत्ता असल्याने या आरक्षण सोडतीचा काहीच परिणाम होणार नसल्याची प्रतिक्रीया शेकापक्षातून व्यक्त होत आहे.


नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूकांच्या तयारीला जिल्हा प्रशासन लागले आहे. या निवडणूकांच्या अनुषंगाने आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम आज सोमवारी पार पडला. प्रांताधिकारी प्रशांत ढगे आणि मुख्याधिकारी अंगाई साळूंखे यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी उपनगराध्यक्षा अ‍ॅड मानसी म्हात्रे, गटनेते प्रदीप नाईक, अनिल झुंजारराव, शेकापक्षाचे शहर चिटणीस अशोक प्रधान यांच्यासह सर्व नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. बरसा समीर बिखे आणि कशीस साबीर शेख या मुलींच्या हस्ते सदर आरक्षणाची सोडत काढण्यात आली.


त्यानुसार बहुसदस्यीय प्रभार रचना सदस्यांसाठी प्रभाग क्रमांक 1 साठी अ साठी खुला(महिला) तर ब साठी खुला सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 2 साठी अ अनुसूचित जमाती (महिला), ब खुला सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 3 अ खुला (महिला), ब खुला सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 4 साठी अ साठी खुला(महिला) तर ब साठी खुला सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 5 साठी अ साठी अनुसूचित जाती (महिला) तर ब साठी खुला सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 6 साठी अ साठी खुला(महिला) तर ब साठी खुला सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 7 साठी अ साठी खुला(महिला) तर ब साठी खुला सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 8 साठी अ साठी खुला(महिला) तर ब साठी खुला सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 9 साठी अनुसूचित जमाती (महिला)तर ब साठी खुला सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 10 साठी अनुसूचित जमाती (सर्वसाधारण)तर ब साठी खुला (महिला).


आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने 15 ते 21 जून दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 6 या दरम्यान नागरिकांना आपल्या हरकती व सूचना अलिबाग नगरपरिषदेच्या कार्यालयात सादर करता येणार असल्याचे यावेळी मुख्याधिकारी अंगाई साळूंखे यांनी जाहिर केले.

आज जाहिर झालेल्या आरक्षण सोडतीचे आम्ही स्वागत करीत आहोत. या आरक्षणामुळे शहरातील राजकीय स्थितीत काहीच फरक पडणार नसून विकास कामांच्या जोरावर पुन्हा एकदा शेकापक्षाचे सर्वच्या सर्व जागांवर म्हणजेच 20 नगरसवेक निवडून येतील.

प्रशांत नाईक, माजी नगराध्यक्ष
Exit mobile version