शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील यांची जोरदार टीका
। अलिबाग । प्रतिनिधी ।
सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील हे शिंदे गटाचा केवळ बोलका बाहुला असून, 50 खोक्याचे टॉनिक मिळाल्यामुळे आता ते राज्यभर हास्यविनोदाचे प्रयोग सादर करण्यासाठी फिरत आहेत. शेतकरी कामगार पक्ष आणि पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर बोलण्याची आ. शहाजीबापू पाटील यांची राजकीय उंची नाही, अशी टीका शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस अनिल पाटील यांनी केली आहे. शहाजीबापू म्हणजे केवळ 50 खोक्याच्या बळावर आणलेले उसने अवसान आहे, अशीही टीकाही त्यांनी केली आहे.
बंडखोरी करुन, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खूपसून केवळ स्वार्थासाठी पळ काढलेल्या शहाजीबापू पाटील यांना केवळ हास्यविनोदामुळे जनता ओळखत आहे. बंडखोरी नाही तर उठाव असे नाव देऊन 50 खोके घेतलेले शहाजीबापू पाटील यांनी काही वर्षांपूर्वी तडीपार असलेल्या मयूर गंभीर यांच्यासारख्या कार्यकर्त्यासोबत व्यासपीठावर बसून निष्ठेचे धडे देणं म्हणजे करुन करुन भागलो, अन् देव पूजेला लागलो, असे आहे, असेही अनिल पाटील यांनी सांगितले.
आपल्या पक्षासोबत गद्दारी करणार्यांनी निष्ठेचे ज्ञान देऊ नये. शहाजीबापू पाटलांनी केलेली गद्दारी जनता कधीच विसरणार नाही. शिंदे गटातील आमदार त्यांच्या बेताल वक्तव्यामुळे यापूर्वीच चर्चेत आले आहेत. तसेच अनेक भ्रष्टाचारातही त्यांनी कुठेही माघार घेतलेली नाही. विहूर प्रकरणात आ. महेंद्र दळवींनी केलेली दलाली सर्वांनाच ज्ञात आहे.
मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे करु, असे पोकळ आश्वासन देणार्या शहाजीबापूंना सांगावेसे वाटते की, त्यांचे बंडखोरीतील 50 खोक्यांचे सहकारी आमदार महेंद्र दळवी यांच्या राहत्या गावात महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. यापेक्षा लाजिरवाणी बाब कोणती, असा खरपूस समाचार अनिल पाटील यांनी घेतला.
50 खोक्यांचे टॉनिक लवकरच संपेल. जनता खोट्या भूलथापांना फसणार नाही. गद्दारांना त्यांची जागा दाखवेल. तोपर्यंत असे हास्यविनोद करीत राहा, बोलक्या बाहुल्यांचा खेळ सुरु ठेवा, अशी टीकाही अनिल पाटील यांनी केली आहे.