प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग-रोहा मार्गावरील रस्त्याच्या कामाला गेल्या वर्षभरापासून सुरुवात करण्यात आली होती. यावेळी अलिबाग ते सुडकोली रस्त्याचे काम जलदगतीने होण्याची अपेक्षा होती. मात्र, काम अपुर्ण असल्याचा फटका पावसाळ्यात प्रवाशांना बसू लागला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डयांचे साम्राज्य निर्माण झाले असून या मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे अपघात होण्याची भिती निर्माण झाली आहे.
अलिबागपासून 82 किलो मीटरचा रस्ता तयार करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शासनाच्या हालचाली सुरु होत्या. रुंदीकरण, मजबुतीकरण, डांबरीकरण यादृष्टीने टप्प्या टप्प्याने रस्त्याचे काम गेल्या वर्षी गुढीपाडव्यापासून सुरु करण्यात आले होते. मात्र, पहिल्याच पावसात या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत शंका निर्माण केली जात आहे. रस्त्याची साईटपट्टी खराब झाली आहे. कुरुळ, पुतूबाईचा पाडा, बामणगाव, वेळवली खानाव, उसर, वावे, फणसापूर अशा अनेक ठिकाणी लहान मोठे खड्डे पडले आहेत. या खड्डयातून प्रवास करणे धोकादायक होऊ लागले आहे. वेळवली खानाव ते उसर पर्यंतचा काँक्रीटरस्ता अपूर्ण केल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसू लागला आहे. रस्त्यावरील खड्डे बूजविण्यात सार्वजनिक बांधकाम विभाग अपयशी ठरत असल्याने प्रवासी व चालक वर्गाकडून नाराजीचे सुर उमटत आहे.
मोठा गाजावाजा करीत या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. तसेच, पावसाळ्यात खड्डयांचा प्रश्न सुटणार अशी आशा प्रवाशांना होती. परंतु, शासनाने जनतेची फार मोठी निराशा केली आहे. अपघात झाल्यावर खड्डे बूजविणार काय, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
अलिबाग-रोहा मार्गावर ठिकठिकाणी पावसामुळे खड्डे पडले आहेत. रस्त्याचा काही भाग खचला आहे. रस्ते दुरुस्तीसह खड्डे बूजविण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. लवकरच या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम केले जाईल.
– जे.ई. सुखदेवे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग






