स्थानिक व्यावसायिक सुखावला
| अलिबाग | शहर प्रतिनिधी |
खऱ्या अर्थाने पावसाळा संपल्यानंतरच्या पहिल्या आठवड्यात पर्यटकांनी पर्यटनासाठी रायगड जिल्ह्याकडे धाव घेतली आहे. विषेशतः अलिबाग तालुक्यातील पर्यटन स्थळांना पर्यटकांमुळे बहर आला आहे. यावेळी मुंबई, ठाणे, पुणे येथील पर्यटकांनी निसर्गाने समृद्ध असलेल्या अलिबाग समुद्रकिनाऱ्यासह परिसरातील इतर समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. त्यामुळे येथील व्यवसायिक देखील सुखावला आहे.
ऐन पर्यटनाच्या हंगामात म्हणजेच मे महिन्यात पावसाने हजेरी लावल्याने त्यावेळी पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायींकांचा हिरमोड झाला होता. कारण पुढील किमान चार महिने तरी पर्यटक याठिकाणी फिरकणार नव्हते. त्यानंरत दिवाळीत पर्यटनाचा नवा हंगाम सुरू होतो. परंतु, तेव्हा देखील पावसाने खोडा घातला आणि चार महिने पर्यटन हंगामाची वाट पाहणाऱ्या व्यावसायिकांचा पुन्हा हिरमोड झाला. त्यातच यंदा पडळेल्या अतिरिक्त पावसामुळे जिल्ह्यातील रस्त्यांची देखील बिकट परिस्थिती झाली आहे. सर्वत्र खड्ड्यांसह चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. परतीच्या पावसासह अवकाळी पडणाऱ्या धारांमुळे त्यात भर पडत राहिली. त्यामुळे पर्यटकांनी जिल्ह्याकडे अक्षरशः पाठ फिरवली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने उसंती घेतल्याने येथील रस्त्यांसह परिसरातील व समुद्रकिनाऱ्यांवरील पावसाचे साचलेले पाणी, चिखल पुर्णतः सुकला आहे. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे तात्पुरते बुंजविण्यात आल्याने पर्यटकांनी रायगड जिल्ह्यासह अलिबाग तालुक्यातील पर्यटन स्थळांकडे धाव घेतलेली दिसत आहे.

दरम्यान, पाऊस संपल्यानंतरच्या पहिल्या आठवड्यातच पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात तालुक्यातील समुद्रकिनारी हजेरी लावली आहे. यावेळी पर्यटकांनी भरतीच्या वेळी पाण्यात भिजण्याचा आनंद लुटला. त्याचबरोबर पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावरील वॉटर स्पोर्टचा देखील मनमुराद आनंद लुटला. तसेच, काहींनी उंट सवारीकरत मज्जा लुटली. यादरम्यान, येथील हॉटेल, रिसॉर्ट आणि कॉटेजेस देखील पर्यटकांनी फुल्ल झाले होते. त्यामुळे व्यावसायिक प्रचंड प्रमाणात सुखावले होते. तसेच, छोट्या-मोठ्या व्यावसायीकांचा देखील धंदा तेजीत होता. तसेच, समुद्र देखील शांत झाल्याने मासळी देखील मोठ्या प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे तालुक्यातील मच्छी बाजारांत देखील मासळी खरेदीसाठी पर्यटकांसह हॉटेल व्यावसायीकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे मच्छी विक्रेत्यांचा देखील धंदा तेजी होता.







