अलिबागची पाणी योजना लालफितीत

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग शहराला वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. गेल्या दीड महिन्यांपासून हा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे प्रलंबित आहे. हा प्रस्ताव अद्याप मंजूर करण्यात आला नाही. त्यामुळे अलिबागमधील पाण्याची योजना लालफितीत अडकल्याचे समोर येत आहे.

अलिबाग शहर पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असून, शहरात वेगवेगळी शासकीय कार्यालये आहेत. शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असल्याने पाण्याची मागणीदेखील वाढू लागली आहे. भविष्यात पाण्याची समस्या निर्माण होऊ नये यासाठी नगरोत्थान योजनेंतर्गत अलिबाग शहराला वाढीव पाणीपुरवठा व वितरण केले जाणार आहे. पुढील तीस वर्षांच्या मागणीनुसार हा प्रस्ताव अलिबाग नगरपरिषदेने शासनाला दीड ते दोन महिन्यांपूर्वीच पाठविला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता मिळाली आहे. हा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे. मात्र, अजूनपर्यंत या प्रस्तावाला विभागाकडून मंजुरी देण्यात आली नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे हा प्रस्ताव आता मंजुरीसाठी लांबणीवर गेल्याने अलिबागकरांना आणखी किती दिवस पाण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नगरोत्थान योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यासाठी हा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठविला असल्याची माहिती येथील अधिकार्‍यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

Exit mobile version