सर्व रस्त्यांची कामे सुरू होणार – अ‍ॅड. जमिर खलिफे

नागरिकांना झालेल्या त्रासाबाबत व्यक्त केली खंत
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।

शहराचा लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून काम करताना शहराच्या सर्वागिण विकासास चालना देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न सुरू असून शहरातील मुख्य रस्त्यांसह अन्य भागांतील म्हणजेच सर्वच रस्त्यांसाठी निधी उपलब्ध झाला असून नोव्हेेंबरपासून सर्व रस्त्यांची कामे सुरू होणार, अशी माहिती राजापूर नगराचे नगराध्यक्ष अ‍ॅड. जमिर खलिफे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

शहरातील तालीमखाना ते जवाहर चौक या मुख्य रस्त्यासह अन्य रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेबाबत सर्व स्तरातून नाराजी व्यक्त होत असून सोशल मिडियावरही टिकेची झोड उठविली जात आहे. यानुषंगाने या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये आपली भूमिका मांडताना खलिफे म्हणाले की, शहरातील तालीमखाना ते जवाहर चौक रस्त्यासाठी मंजूर झालेला एक कोटीचा निधी राज्यातील सत्तांतरानंतर काहीसा तांत्रिक बाबींमुळे अडकला. मात्र आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून पुढील काही दिवसात हा निधी नगर परिषदेकडे वर्ग होणार आहे. त्यामुळे या रस्त्याचे गटारांसह डांबरीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात खड्डे भरण्यात येणार असल्याचे तसेच, शहरातील शिवाजी पथ ते कोंढेतड पुलापर्यंतच्या रस्त्यासाठी अतिवृष्टीतुन दोन कोटीचा निधी मंजूर झालेला आहे, तर वरचीपेठ पुलापर्यंत नगरोत्थान योजनेंतर्गत रस्ता मंजूर आहे. कोंढेतड भागातील महामार्गापर्यंतचा रस्ता देखील ठोक अनुदानात मंजूर असून शहरातील अन्य प्रभागांतील नादुरूस्त रस्ते देखील विविध निधीतून प्रस्तावित आहेत. ही सर्व कामे येत्या महिन्यापासून सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे कोरोनासंसर्ग, टाळेबंदी आणि शासनाकडून निधीची कमतरता, यामुळे आपल्याला अपेक्षित असा शहराचा विकास करता आला नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल दिलीगिरी व्यक्त करत असल्याचे नमुद करत आपण नक्कीच भविष्यात मुख्य रस्त्यासह अन्य सर्व रस्ते सुस्थितीत कशा प्रकारे असतील याची खबरादारी घेणार असल्याचे आश्‍वासनही त्यांनी यासमयी दिले.

Exit mobile version