बांधकाम विभागाचा कंपनीला दणका

नेरळ-कशेळे येथील रस्त्याची खोदाई नियमबाह्य केल्याचा ठपका

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील नेरळ-कशेळे या राज्यमार्गाच्या बाजूने ओएफसी केबल टाकण्याचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने थांबवले आहे. त्यामुळे संबंधीत कंपनीला चांगलाच दणका बसल्याचे बोलले जाते.

नवी मुंबई येथील दिनेश इंजिनिअरिंग कंपनीला केबल टाकण्याची परवानगी दिली होती. मात्र संबंधित कंपनीने रस्त्याच्या बाजूला असलेली साईडपट्टी खोदून त्यात केबल टाकण्याचा प्रकार सुरु केला होता. बांधकाम विभागाने त्याला आता चाप लावला आहे.

नेरळ-कशेळे मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने काही कोटी खर्च करून रस्त्याचे नेरळ कोल्हारे, जिते तसेच वाकस या भागात काँक्रीटीकरण तर अन्य भागात डांबरीकरण केले आहे. या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोकण भवन येथील अधीक्षक अभियंता कार्यालयाने परवानगी दिली आहे. संबंधीत कपनीने काँक्रीट रस्त्याच्या बाजूने जेसीबी मशीनचे साहाय्याने खोदकाम करून केबल टाकण्याचा प्रकार सुरु केला. त्याबद्दल रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम करणार्‍या ठेकेदार कंपनीने या कंपनीच्या मनमानी विरोध आक्षेप घेतला. रस्त्याची अनेक वर्षे भराव करून बनवलेली साईड पट्टी खोदून त्यात केबल टाकण्याचे काम केले जात असल्याने अनेक ठिकाणी वाहने त्या केबलच्या खड्ड्यात कोसळत आहेत. त्याचवेळी अवजड वाहने रस्त्याच्या कडेने किंवा खोदकाम करून भराव टाकलेल्या रस्त्याने गेल्यावर रस्त्याला तडे पडत आहेत.

या सर्व प्रकारची पहाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता संजीव वानखेडे यांनी केली. त्यानंतर नवी मुंबई येथील दिनेश इंजिनिअरिंग यांना एका पत्राद्वारे केबल टाकण्याचे काम थांबवण्याचे आदेश दिले. त्याचवेळी या रस्त्यावर काँक्रीट रस्त्यालगत खोदकाम केल्याने रस्त्याची झालेली नुकसान भरपाई देण्याचे किंवा खराब झालेला रस्ता बनवून देण्याचे आदेश या नोटिशीत दिले आहेत. तसेच रस्त्याच्या कडेला केलेले खोदकाम हे तातडीचे भराव टाकून बुजविण्याचे आदेश दिले आहेत. केबल टाकण्यासाठी दिलेल्या परवागनीनुसार ठराविक अंतरावरच केबल टाकण्यात यावी, असे सूचित केले आहे.

याबाबत संबंधीत कंपनी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version