केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांना निवेदन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील मच्छिमार बांधवांची गैरसोय दूर करण्यासाठी बोडणी, अलिबाग, नागाव येथे अत्याधुनीक सोयी सुविधा असणार्या जेट्टीच्या कामांना परवानगी द्या. या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी दिल्लीम केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसायमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन जयंत पाटील यांना दिले.
आ. जयंत पाटील यांनी यावेळी मागणी करताना आपल्या मतदार संघातील अलिबाग, बोडणी आणि नागाव येथील मासेमारी जेट्टीची अत्याधुनिकरित्या विकास करण्याची गरज असल्याचे सांगितले. मुंबईतील ससून डॉक येथील बंदर हे ब्रिटिशकालीन असून, तेथे मोठ्या संख्येने मासेमारी नौका मासेमारी आणि तत्सम कारणाकरिता उभ्या असतात. मुंबई, नवी मुंबई, पनवेल आणि तळोजा एमआयडीसी यांच्या सांडपाण्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होते. बोडणी आणि अलिबाग परिसरात दोन हजारांहून अधिक मासेमारी नौका आहेत. त्यांना इंधन आणि बर्फदेखील सहज उपलब्ध होतो. बोडणी आणि अलिबाग येथे मासेमारी जेट्टी उभारल्या, तर गुजरात राज्यातील मासेमारी नौकांनाही त्याचा लाभ होईल. तसेच एमआयडीसी जलशुद्धीकरण प्रकल्प प्रस्तावित जेट्टीपासून सुमारे 8 ते 10 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे आयसीई कारखाना आणि कोल्ड स्टोअर प्रोसेसिंग युनिटची सुविधादेखील सहज उपलब्ध होईल.
त्याचप्रमाणे बोडणी आणि अलिबाग मासेमारी जेटीच्या प्रस्तावित विकासासाठी आवश्यक असलेली जमीन कोणत्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध आहे. या जेट्टींचा विकास झाल्यास प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे 10 ते 12 हजार लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच मासेमारी करणार्या बोटींची संख्यादेखील वाढेल. राज्य शासनाचादेखील यावर कोणताही आक्षेप नाही. त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांनी या दोनही मासेमारी जेटी विकसित करण्याच्या प्रस्तावावर विचार करावा, अशी मागणी आ. जयंत पाटील यांनी केली आहे.
