। अलिबाग । वर्षा मेहता ।
अफगाणिस्तानच्या केंद्रातील सत्ता बदलल्यामुळे भारताबरोबर सुक्या मेव्यांच्या व्यापारावर आता परिणाम होऊ लागला आहे. मागच्या दशकभरात मागणी वाढलेल्या ड्राय फ्रूटसमधील अंजीर, बदाम, मनुके, काजू, पिस्ता, अक्रोड, शहाजीरे यासह अगदी लज्जतदार टेस्टींग पावडर ही प्रामुख्याने अफगाणिस्तानमधून आयात होते. मात्र, मागच्या आठवडाभरात तेथे निर्माण झालेल्या स्थितीचा फटका भारतीय ड्राय फ्रूट बाजाराला बसला असून सुक्यामेव्यातील अनेक वस्तूंचा दर वधारला आहे.
सण उत्सवात खाद्यपदार्थात लज्जत वाढवणार्या काही साहित्याच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ, तर काहींच्या दरात स्थिरता दिसून आली. प्रमुख साहित्य असलेले बदाम, खारे व साध्या पिस्ताच्या दरामध्ये 200 ते 400 रुपयांनी वाढ झाली आहे. याचा फटका ग्राहकांना बसणार आहे.
एकीकडे कोरोनामुळे नागरिकांच्या आर्थिक संकटांमध्ये वाढ होत आहे आणि दुसरीकडे सणांच्या दिवसात गॅस, डिझेल, पेट्रोल याचे दर सातत्याने वाढत आहे. त्यात भर पडली आहे ती सुक्या मेव्याची. गणपतीमध्ये विविध गोडाचे पदार्थ केले जातात.त्यामध्ये सुक्या मेव्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर असतो.त्यामुळे सण साजरे करायचे तरी कसे असा प्रश्न सर्व सामान्यांकडून विचारला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून बदाम,पिस्ता यांसारख्या सुक्या मेव्यांच्या किमतीत झपाट्याने वाढ झाली आहे. सुक्या मेव्यांच्या किमतीत वाढ होण्याचे मुख्य कारण अफगाणिस्तानातून मालाचा पुरवठा थांबला आहे.
कॅलिफॅरनिया बदामचे पीक कमी आहे या वेळेला आणि त्याच बरोबर आयात करण्याचे दर वाढले आहेत त्यामुळे बदामचे दर वाढले. अंजिर, साधा पिस्ता, साधी मनुका, काळी मनुका हे अफगाणिस्तानातुन मोठ्या प्रमाणावर येतात त्यामुळे दिवाळी पर्यत त्यांची भाववाढ राहण्याची शक्याता आहे.
मोहनभाई, मालक- महादेव ड्रायफ्रुट्स अँड मसाला
दर: 2021 2020
बदाम – 1000 800
काजू- 1000 1000
खारे पिस्ता- 1400 1200
सादा पिस्ता- 1800 1600
मनूका- 400 400