| सुधागड-पाली | वार्ताहर |
अंबा नदीतून पालीकारांना पाणीपुरवठा केला जातो. काही दिवसांपूर्वी येथील जॅकवेलजवळ अंबा नदी पात्रात व सभोवताली घाण व कचरा झाला होता. या पार्श्वभूमीवर पाली नगरपंचायतीमार्फत अंबा नदी पात्राची पूर्णपणे स्वच्छता करण्यात आली आहे. नगराध्यक्षा प्रणाली शेळके, नगरपंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी विद्या येरूणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा सभापती सुलतान बेनसेकर यांनी नगरपंचायत कर्मचार्यांद्वारे ही साफसफाई केली आहे.
यावेळी अंबा नदीच्या पाण्यावरील प्लास्टिक पिशव्या व बॉटल, निर्माल्य, घाण, कचरा पालापाचोळा काढण्यात आला. तसेच आजूबाजूच्या परिसराची योग्यप्रकारे स्वच्छता व साफसफाई करण्यात आली आहे. त्यामुळे अंबा नदी पात्र आता चकाचक झाले आहे. पाणीपुरवठादेखील सुरळीत व स्वच्छ होत आहे.