Ambenali Ghat: आंबेनळी घाट चार दिवस वाहतुकीसाठी बंद

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

। अलिबाग । प्रतिनिधी ।

पावसाळ्यात अतिवृष्टी, भूस्खलन, दरड कोसळणे तसेच सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने उद्भवणारा धोका लक्षात घेऊन पोलादपूर–महाबळेश्वर (आंबेनळी) राज्य महामार्ग (SH-139) दि.3 ते 6 जुलै या कालावधीत सलग चार दिवस सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. असे आदेश जिल्हादंडाधिकारी किशन ना. जावळे यांनी जारी केले आहेत.

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, पोलादपूर–आंबेनळी–महाबळेश्वर हा राज्य महामार्ग सह्याद्री पर्वतरांगेतील अत्यंत संवेदनशील, भूस्खलनप्रवण व दरडप्रवण घाट विभागातून जातो. या मार्गावरील तीव्र उतार, खोल दऱ्या, नैसर्गिक जलप्रवाह, हवामानामुळे विदीर्ण झालेले बेसॉल्ट खडक, अस्थिर मातीचे थर आणि दाट वनक्षेत्र यामुळे पावसाळ्यात हा मार्ग अत्यंत धोकादायक बनतो.

भारतीय हवामान विभागाच्या नोंदीनुसार या परिसरात दरवर्षी अतिमुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून, अल्प कालावधीतही तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असते. त्यामुळे उतारांची स्थिरता कमी होऊन भूस्खलन, दरड कोसळणे, दगड घसरणे, भूस्तर खचणे, वृक्ष उन्मळून पडणे तसेच रस्त्यावरून वेगाने पाणी वाहणे अशा घटना कोणतीही पूर्वसूचना न देता घडू शकतात. यामुळे सार्वजनिक वाहतुकीस गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

तसेच घाट परिसरात मोठ्या प्रमाणावर दरडी व दगड रस्त्यावर कोसळणे, भरावांची धूप होऊन रस्ता खचणे, खोल दऱ्यांच्या बाजूचा रस्ता कमकुवत होणे, दाट धुके व कमी दृश्य अंतरामुळे अपघातांचा धोका वाढणे तसेच बचाव व आपत्कालीन यंत्रणांच्या हालचालींमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

यापूर्वीही अशा प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीत आंबेनळी घाटात भूस्खलन, दरड कोसळणे, वृक्ष पडणे व वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटना घडल्या असून, सार्वजनिक सुरक्षिततेला प्राधान्य देत वेळोवेळी घाटबंदीचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. त्यामुळे संभाव्य जीवितहानी व अपघात टाळण्यास मदत झाली होती.

तहसीलदार तथा अध्यक्ष, तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पोलादपूर यांनीही दि. 3 ते 6 जुलै या कालावधीत आंबेनळी घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याची शिफारस केली होती. तसेच पोलीस अधीक्षक, रायगड यांनी अवजड वाहतूक पूर्णपणे बंद ठेवणे आवश्यक असल्याचे तसेच ऑरेंज व रेड अॅलर्टच्या कालावधीत हलक्या वाहनांनाही प्रवेश बंद ठेवण्याबाबत अभिप्राय सादर केला होता.

'या' मार्गांचा वापर करावा
घाटबंदीच्या कालावधीत पुणे, सातारा आणि पश्चिम महाराष्ट्राकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी महाड–माणगाव–ताम्हिणी घाट किंवा पोलादपूर–चिपळूण–कराड या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Exit mobile version