पगारवाढ- इतर मागण्या मान्य न झाल्यास कामबंद आंदोलन
। सुधागड -पाली । वार्ताहर ।
नियमित वेतन व कोरोना काळातील बोनस मिळावा आणि पगारवाढ व्हावी या मागण्या पूर्ण होण्यासाठी जिल्ह्यातील 108 क्रमांक रुग्णवाहिका चालकांनी संबधीत विभागांना निवेदन दिले आहे. येत्या 25 मार्चपर्यंत यावर तोडगा न काढल्यास कामबंद आंदोलन करणार असल्याचा इशारा रुग्णवाहिका चालकांनी दिला आहे.
महाराष्ट्र रुग्णवाहिका 108 वाहन चालक संघटनेच्यावतीने बी. व्ही.जी.इंडिया लिमिटेड, जिल्हा व्यवस्थापक रायगड अलिबाग, जिल्हा शल्यचिकित्सक सुहास माने, तसेच रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक रायगड यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
यामध्ये नमूद केले आहे की जिल्ह्यातील 108 रुग्णवाहिका वाहन चालक (पायलट) सन 2014 पासून बी.व्ही.जी.इंडीया लि. कंपनीमध्ये कंत्राटी रुग्णवाहिका चालक म्हणून कामावर रुजू आहेत. पण 2014 पासून आजपर्यंत आमच्या किमान वेतनात एकही रुपयाची वाढ झालेली नाही. तसेच आम्हाला वेतन कोणत्या स्वरूपात येते याची विचारणा केली असता विचारून सांगतो, उद्या सांगतो, मला माहीत नाही. अशा प्रकारच्या उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. जर या विषयाची समाधानकारक उत्तर देण्यास समर्थ नसाल तर वेतन खात्याच्या संबंधित अधिकार्यांसोबत आठ दिवसात रायगड जिल्ह्यामध्ये वाहन चालकांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात यावे.
येत्या आठ दिवसांत बैठकीचे आयोजन करण्यात आले नाही. तर ठीक नवव्या दिवशी जिल्ह्यातील सर्व 108 वाहन चालक काम बंद आंदोलन करतील आणि या गोष्टीची सर्वस्वी जबाबदारी तुमची असेल असे निवेदनात म्हटले आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये, म्हणून निवेदन देत आहोत. आठ दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास कामबंद आंदोलनाचा पर्याय आमच्यासमोर असल्याचे रुग्णवाहिका चालकांचे म्हणणे आहे.