। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जे. एस. एम. महाविद्यालय, अलिबाग येथील आयक्यूएसी स्टुडन्ट सपोर्ट अँड प्रोग्रेशन कमिटी व एनएसएस युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय ध्यान विपश्यना कार्यशाळेचे आयोजन 16 मार्च रोजी महाविद्यालयाच्या जयवंत केळूसकर सभागृहात करण्यात आले होते.
याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विपश्यना विश्व विद्यापीठ इगतपुरी येथे विपश्यना सहाय्यक आचार्य म्हणून कार्यरत असलेले ज्ञानदेव बनसोडे उपस्थित होते. या कार्यशाळेचे संयोजक डॉ. आय.पी.कोकणे यांनी प्रास्ताविक केले. ज्ञानदेव बनसोडे यांनी ध्यानाचे महत्त्व पटवून देताना सांगितले. ध्यानाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या ध्येयावर तसेच दैनंदिन कार्यावर प्रभावीपणे मन एकाग्र करता येते, परंतु केवळ मन एकाग्र करणे पुरेसे नाही तर मनाला कुशल कर्माकडे वळवणेही आवश्यक आहे. अकुशल वृत्ती काढून टाकून कुशल वृत्तीकडे मनाला वळवणे यासाठी ध्यान विपश्यना आवश्यक आहे असेही त्यांनी सांगितले. ध्यान विपश्यना कशी करावी याचे प्रात्यक्षिक सुद्धा त्यांनी करून दाखविले.
जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड.गौतम पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ.आय.पी.कोकणे, डॉ.प्रवीण गायकवाड, डॉ.मीनल पाटील, डॉ.सुनील आनंद, प्रा.के.बी.चौगुले, डॉ. प्रेम आचार्य, प्रा. के.एम. कुलकर्णी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.