अमोल नाईक यांना पितृशोक

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील ढवर येथील महादेव नाईक यांचे रविवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. निधनासमयी ते 70 वर्षाचे होते. पीएनपी एज्युकेशन सोसायटीचे जनसंपर्क अधिकारी, पत्रकार, वृत्तपत्र छायाचित्रकार अमोल नाईक यांचे ते वडील होतं.

मितभाषी, मनमिळाऊ स्वभावाचे  महादेव नाईक हे  सेवानिवृत्त कर्मचारी होते.  रविवार (दि.10) रोजी सायंकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्यावर अलिबागमधील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरु होते. दरम्यान त्यांचा उपचारावेळी मृत्यू झाला. सोमवार (दि.11) रोजी सकाळी ढवर येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकिय, सामाजिक, शैक्षणिक, क्रिडा, पत्रकारिता, वकिल, छायाचित्रकार अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळींसह ग्रामस्थ व नातेवाईकांनी उपस्थित राहून त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.

त्यांच्या पश्‍चात पत्नी माधुरी नाईक, मुलगा अमोल नाईक, मुलगी सिमा रोहिदास धसाडे, मोठे बंधू परशुराम नाईक व परिवार, सून, नातवंडे, जावई व इतर कुटुंबीय असा मोठा परिवार आहे.  दशविधी कार्य (दहावे) मंगळवार (दि.19) रोजी सकाळी ठीक आठ वाजता ढवर येथील तळ्यावर होणार असल्याची माहिती नाईक कुटुंबियांकडून देण्यात आली.

महादेव नाईक यांच्या निधनाची बातमी समजताच शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांचे स्वीय्य सहाय्यक कमलाकर वाघमोडे, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, वेगवेगळ्या ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, पत्रकार, छायाचित्रकार आणि इतर राजकीय पक्षाची मंडळी यांनी घरी जाऊन नाईक कुटुंबियांचे सांत्वन केले.

Exit mobile version