अमोल पेपर मिल बंद; ५० कामगार उघड्यावर

स्वयंघोषित नेत्याच्या त्रासाला कंटाळून मालकाचा निर्णय
। खोपोली । प्रतिनिधी ।
महाराष्ट्रातील सत्तापरिवर्तन झाल्यापासून खालापूर तालुक्यातील गल्लीतील कार्यकर्तेसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या नावाने कारखान्यांना धमकावण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा सुरू झाली असून, याचा परिणाम एक कंपनी बंद करण्यापर्यंत पोहोचला आहे. तालुक्यातील जांभिवली (छ) या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात असलेला अमोल पेपर मिल हा कारखाना नुकताच बंद करण्यात आला असून, गेली 25 ते 30 वर्षे काम करणार्‍या 50 कामगारांवर मोठे संकट कोसळले आहे. या कारखान्याला गेले काही दिवस विशिष्ट राजकीय पक्षांच्या स्वयंघोषित नेत्याने त्रास द्यायला सुरुवात केली होती.स्वत:ला मोठा नेता समजणार्‍या या नेत्याने कंपनीतील खराब पाणी बाहेर टाकण्यास मज्जाव करीत केलेली सौदेबाजी कंपनीच्या मालकाला परवडण्यासारखी नसल्याने अखेर कंपनी मालकाने कारखाना बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते आहे.

याला कामगारांनी दुजोरा दिला असून, कथित नेत्याच्या नावाने कामगार व त्यांचे कुटुंबीय टाहो फोडत आहेत. खालापूर तालुक्यातील अमोल पेपर मिल कंपनी ही मागणी 30 वर्षांपासून सुरू आहे. कामगारांना वेळेवर पगार देणारी कंपनी म्हणून या कंपनीचे नाव सर्वदूर आहे. कंपनीत स्थानिक अशिक्षित कामगारांना सामावून घेतल्याने अनेक संसार सुखाचा आनंद घेत होते. सर्वच कामगारांना साधारण 25 हजारांच्या आसपास पगार होता. या सर्व कामगारांना कारखाना बंद करण्यात आल्याने आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

कामगारांची देणी देणार
कंपनी बंद करताना शासकीय नियमानुसार कामगारांना जो काही मोबदला द्यावा लागतो, तो कंपनीकडून मिळणार असल्याचे व्यवस्थापकाकडून कामगारांना सांगण्यात आले आहे. कामगारांची कंपनी किंवा मालकाबद्दल कोणतीच तक्रार नाही. मात्र, ज्या नेत्याने स्वतःची पोळी भाजण्यासाठी हा प्रकार केला आहे, त्याविरोधात कामगारांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, कंपनीला त्रास देणारा हा स्वयंघोषित नेता कोण, याबाबत खोपोली परिसरात सध्या उलटसुटल चर्चांना उधाण आले आहे.

Exit mobile version