आदिवासी विद्यार्थिनीची गगनभरारी

| पाली | प्रतिनिधी।

आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ग्लोबल स्कॉलरशिप प्रोग्रॅम अंतर्गत अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग, ठाणे यांच्या अधिपत्याखालील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, घोडेगाव अंतर्गत आदिवासी मुलींचे शासकीय वस्तीगृह, हडपसर, पुणे येथे शिक्षण घेत असलेली सपना राजेश वाघमारे हिची उच्च शिक्षणासाठी युनिव्हर्सिटी ऑफ तसेच क्वीन मेरी युनिव्हर्सिटी, यूके येथे निवड झाली आहे. सपना राजेश वाघमारे ही रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कोलाड येथील रहिवासी असून ती कातकरी समाजातील अत्यंत दुर्गम भागातील विद्यार्थिनी आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि आर्थिक अडचणींवर मात करत भारतीय संविधाना मुळे तिने हे यश संपादन केले आहे. मोलमजुरी करून आपल्या मुलीला शिक्षण देणाऱ्या पालकांसाठी तसेच संपूर्ण आदिवासी विकास विभागासाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. आपल्या मुलीने जागतिक स्तरावर शिक्षणासाठी झेप घेतल्याने पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई, गृहपाल अर्चना पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एकलव्य फाउंडेशनमार्फत मिळालेल्या शैक्षणिक मार्गदर्शनामुळे सपनाने परदेशात उच्च शिक्षण घेण्याचा निर्धार केला आणि त्यात यश मिळविले. आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांसाठी सपना वाघमारे हिचे यश प्रेरणादायी ठरणार असून, ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर मोठी स्वप्ने पूर्ण करू शकतात, हे तिने सिद्ध करून दाखविले आहे.

Exit mobile version