| बिहार | वृत्तसंस्था |
पुण्यात ही घटना घडलेली असताना बिहारमध्ये आणखी एक हेलिकॉप्टर दुर्घटना घडली आहे. हवाई दलाचे एक हेलिकॉप्टर पूरग्रस्त भागामध्ये पाण्यात कोसळले. ही घटना मुजफ्फरपूर येथे घडली आहे. पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्याचे काम हे हेलिकॉप्टर करत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सीतामढी येथून गरजेचे सामान घेऊन हवाई दलाचे हेलिकॉप्टर मुजफ्फरपूरच्या पूरग्रस्त भागामध्ये गेले होते. त्याचवेळी हेलिकॉप्टरला अपघात झाला आणि ते पुराच्या पाण्यात कोसळले. घटनेनंतर एसडीआरएफची एक टीम आणि स्थानिक गावकऱ्यांनी बचावकार्य सुरु केले. हेलिकॉप्टरमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढले. काही लोकांनी बोटीद्वारे बचावकार्य सुरु केले. तर काही महाभाग हेलिकॉप्टरमधून आणलेलं सामान लुटण्यात व्यस्त होते. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मुख्य सचिव प्रत्यय अमृत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पायलटच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला. इंजिन फेल झाल्यानंतर पायलटने पाण्यामध्ये लँडिंग केले. त्यामुळे एअरफोर्सचे सर्व जवान आणि स्वतः पायलट सुरक्षित राहिले. जखमींना उपचारासाठी एसकेएमसीएचला पाठवण्यात आले. एसडीआरएफच्या एक टीमने घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले होते. त्यामुळे बिहार सरकारने एसडीआरफच्या टीमला पुरस्कृत करण्याची घोषणा केली आहे. घटना घडली तेव्हा काही स्थानिक लोक सेल्फी काढत व्हिडीओ बनवत होते.