| उरण | प्रतिनिधी |
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत विशेष स्थान असलेल्या गौरी-गणपती उत्सवाला सुरुवात होताच घराघरांत भक्ती आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गणपती बाप्पाच्या आगमनानंतर गौरीच्या आगमनाची चाहूल लागल्याने महिला वर्गासह लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांमध्ये उत्साह संचारला होता. दरम्यान, गणरायाच्या जयघोषाने परिसर दुमदुमत असतातना जिल्ह्यासह उरण तालुक्यात गुरूवारी (दि.17) गौराईच्या स्वागतासाठी घराघरांत जय्यत तयारी करण्यात आली होती.
गणपती बाप्पाला बुद्धी, विवेक आणि मंगलतेचे प्रतीक मानले जाते, तर गौराईला सुख-समृद्धी, सौभाग्य आणि मातृशक्तीचे प्रतीक मानण्याची परंपरा आहे. त्यामुळे गौरी-गणपतीचा उत्सव हा धार्मिक श्रद्धेबरोबरच महाराष्ट्राच्या कौटुंबिक आणि सामाजिक जीवनाशी घट्ट जोडलेला आहे. महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांमध्ये गौराईला माहेरवाशीण मानले जाते. गणपती बाप्पाच्या आगमनानंतर गौरी आपल्या माहेरी येते, अशी श्रद्धा असल्याने तिचे स्वागत घरातील लेकीप्रमाणे केले जाते. यादरम्यान घराची स्वच्छता, आकर्षक सजावट, रांगोळी, फुलांची आरास आणि पारंपरिक पद्धतीने गौरईची स्थापना करून पूजन केले जाते. अनेक ठिकाणी गौराईला साडी, दागिने आणि विविध अलंकारांनी सजविण्यात येते. दरम्यान, गणेशोत्सवासह गौरी पूजन पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करण्याचे आवाहनही करण्यात येत आहे. सजावटीमध्ये प्लास्टिकचा वापर टाळणे, नैसर्गिक वस्तूंचा वापर करणे, निर्माल्याची योग्य विल्हेवाट लावणे आणि पाण्याची बचत करणे यावर देखील भर दिला जात आहे. त्यामुळे भक्तीबरोबर पर्यावरणाचे भान राखण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
यावेळी जिल्ह्यासह उरण तालुक्यात गुरूवारी (दि.17) गौराईचे आगमन झाले असून, शुक्रवारी (दि.18) गौरी पूजनाच्या दिवशी घरातील महिलांकडून विविध पारंपरिक पदार्थांचा नैवेद्य तयार केला जातो. त्यात पुरणपोळी, विविध भाज्या, भाकरी, खीर, लाडू, करंजी, मोदक यांसह अनेक पदार्थांची रेलचेल पाहावयास मिळते. तसेच, यानिमित्ताने पारंपरिक पाककलेला उजाळा मिळत असून, जुन्या पिढीकडून पुढील पिढीकडे अनेक खाद्यपरंपरा पोहोचत आहेत. त्याचबरोबर अनेक घरांमध्ये हळदी-कुंकवाचे कार्यक्रमही आयोजित केले जातात. यावेळी सुवासिनींना आमंत्रित करून त्यांचा सन्मान केला जातो. त्यामुळे महिलांना एकत्र येण्याची संधी मिळते. आप्तेष्टांच्या भेटीगाठी, प्रसादाची देवाणघेवाण आणि कौटुंबिक संवादामुळे नात्यांमध्ये आपुलकी वाढते.
गौरी-गणपती उत्सव हा रायगड जिल्ह्यासह उरण तालुक्यात श्रद्धा, परंपरा, संस्कृती आणि सामाजिक एकतेचा सुंदर संगम मानला जातो. भक्तीच्या वातावरणात कुटुंब एकत्र येते, नात्यांना उजाळा मिळतो आणि संस्कृतीचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचतो. त्यामुळे बदलत्या काळातही गौरी-गणपती उत्सवाची परंपरा आणि त्यामागील भावनिक नाते आजही तितकेच जिवंत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. दरम्यान, गौराईच्या आगमनानंतर काही दिवस घरात उत्साहाचे वातावरण असते. मात्र, गौराईच्या निरोपाचा क्षण मात्र भावनिक असतो. यावेळी शनिवारी (दि.19) माहेरवाशीण म्हणून आलेल्या गौराईला निरोप देण्यात येणार असून, पुढील वर्षी पुन्हा तिचे आगमन व्हावे, कुटुंबात सुख-शांती नांदावी आणि सर्वांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी प्रार्थना केली जाईल.
नव्या पिढीला संस्कृतीची ओळख
गौरी-गणपती उत्सवाच्या माध्यमातून नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची आणि परंपरांची ओळख करून देण्याचे कामही होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वाढणाऱ्या मुलांना पूजनपद्धती, पारंपरिक सजावट, रांगोळी, नैवेद्य आणि कुटुंबातील ज्येष्ठांकडून सांगितल्या जाणाऱ्या परंपरांमुळे आपल्या सांस्कृतिक मुळांशी जोडले जात आहे.
स्त्रीशक्तीला मानाचे स्थान
गौरी पूजनामध्ये स्त्रीशक्तीला मानाचे स्थान दिले जाते. कुटुंबाच्या सुख-दुःखात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महिलांच्या योगदानाचा सन्मान या उत्सवातून अधोरेखित होतो. त्यामुळे गौरीचा सण हा धार्मिक उत्सवाबरोबरच कौटुंबिक मूल्ये आणि सामाजिक नातेसंबंध दृढ करणारा उत्सव ठरतो.





