आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

अमेरिकन ग्राहकांना लुटणारी टोळी गजाआड; 35 जणांना केली अटक, पोलीस मास्टर माईंडच्या शोधात

| खास प्रतिनिधी | रायगड |

अलिबाग तालुक्यातील परहूर गावातील ‘नेचर एज अलिबाग’ या रिसॉर्टवर रायगड पोलिसांनी गुरुवारी रात्री 10 वाजता छापा टाकला. अमेरिकेतील ग्राहकांना फेक कॉल करून त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात येत होती. याप्रकरणी पोलिसांनी एकूण 35 जणांवर कारवाई केली आहे. या कारवाईत 55 मोबाईल फोन, 31 संगणक, 31 हेडफोन, पाच चारचाकी वाहने, एक मोटारसायकल यासह अन्य मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

दरम्यान, आवास परिसरातदेखील असेच कॉल सेंटर सुरु होते. मात्र, पोलिसांनी धाड टाकण्याआधीच त्यांना कुणकुण लागल्याचे तेथील काहीजण रफूचक्कर झाले आहेत. पोलिसांनी येथून दोन आरोपी ताब्यात घेतले आहेत.

अलिबाग-परहूर येथे गेल्या काही वर्षांपासून येथे विविध हॉटेल आणि रिसॉर्ट विकसित झाले आहेत. नेच एज अलिबाग या रिसॉर्टमध्ये काहीतरी संशयास्पद घडत असल्याची माहिती स्थानिकांकडून पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी रेकी करुन रिसॉर्टवर धाड टाकली. त्यावेळी तेथे एक कॉल सेंटर सुरु असल्याचे आढळून आले. तेथे काम करणार्‍यांना ताब्यात घेऊन माहिती घेतली असता ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार घडत असल्याचे समोर आले. अमेरिकेतील नागरिकांशी इंटरनेट आणि अ‍ॅपच्या माध्यमातून संपर्क साधत होते. व्हायग्रा, सीयालीस, लिविट्रो अशी औषधांवर अमेरिकेत बंदी आहे. सदरची औषधे घरपोच पुरवण्याचे आमिष समोरच्या व्यक्तीला दाखवण्यात येत होते. त्या बदल्यात पेमेंटकरिता गीफ्ट कार्डचा वापर करावा, असे सांगत. ते गीफ्ट कार्ड कोणाच्या तरी सहायाने रिडीम करुन ते पेमेंट (रक्कम) हवालामार्गे भारतीय चलनात आरोपी रोहित बुटाने याच्याकडे जमा केले जायचे. रोहित हा मिराभाईंदर येथे राहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक किशोर साळे, पोलीस उपनिरीक्षक संतोष भुंडेरे, पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांच्यासह अन्य पोलीस कर्मचार्‍यांनी कारवाई केली.

ओरोपी अमेरिकन अ‍ॅक्सेंटमध्ये बोलायचे
अलिबाग-परहूर कॉल सेंटरमध्ये काम करणार्‍या 32 आरोपींना पकडले आहे. पैकी एक आरोपी महिला आहे. तसेच आवास येथे दोन अशा एकूण 35 आरोपींना अटक केले आहे. सर्व आरोपींनी विशिष्ट प्रशिक्षण घेतले आहे. त्यामुळे ते अमेरिकन नागरिकांशी अमेरिकन अ‍ॅक्सेंटमध्ये बोलायचे. त्यामुळे समोरच्यावर प्रभाव पडायचा आणि मासा गळाला लागायचा. सर्व संगणक हे न्याय वैद्यक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याची तपासणी झाल्यावरच किती आर्थिक उलाढाल झालीय हे स्पष्ट होणार आहे.
अमेरिकेतील मोबाईल नंबर आरोपी कसे मिळवायचे?
आर्थिक फसवणुकीसाठी आवश्यक असणारे मोबाईल नंबर हे आरोपींना मिळवून देण्यासाठी अमेरिकेत असणारे काही भारतीय हे तेथील कंपनीकडून सदरचे मोबाईल नंबर विकत घ्यायचे. त्यानंतर ते भारतातील व्यक्तीकडे पाठवले जायचे. याच नंबरचा आधार घेऊन अमेरिकन नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जायची, असा पोलिसांना संशय आहे.
जिल्ह्यातील रिसॉर्टची होणार तपासणी
सदरच्या रिसार्टमधील 12 खोल्या भाड्याने घेतल्या होत्या. गेल्या सहा-सात महिन्यांपासून असे उद्योग सुरु असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात असणार्‍या सर्वच रिसॉर्ट आणि हॉटेलची तपासणी करण्याची मोहीम उघडणार असल्याची माहिती घार्गे यांनी दिली. त्यामुळे असे काही अनधिकृत व्यवसाय किंवा बेकायदेशीर कृत्य समोर येतील. याप्रकरणी रिसार्टच्या मालकाला चौकशीला बोलवण्यात येणार आहे.
वेटरला देत होते 300 रुपयांची टिप
नेचर एज अलिबाग रिसॉर्टमध्ये सुरु असलेल्या बेकायदेशीर कॉल सेंटरमध्ये राहणारे शेजारी असणार्‍या हॉटेलमधून जेवण मागवत होते. दररोज जेवणाची ऑर्डर दिली जात होती. काही वेळा हॉटेलमध्ये खाण्या-पिण्यासाठी येणारे हे संबंधित वेटरला 200-300 रुपयांची टिप देत असल्याचे बोलले जाते. सर्व आरोपी हे परराज्यातील असून, त्यामध्ये एकही महाराष्ट्रीयन नाही.
Exit mobile version