अनंत गीतेंना मिळणार आघाडी

शेकाप तालुका चिटणीस वसंत यादव यांचा विश्‍वास

। अलिबाग । प्रतिनिधी ।

श्रीवर्धन तालुक्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. मतदारांसह कार्यकर्ते स्वंयस्फुर्तीने सभा, बैठकांना हजेरी लावून गीतेंना पाठींबा देत आहेत. त्यामुळे या लोकसभेच्या निवडणूकीत अनंत गीते यांनाच श्रीवर्धनमधून आघाडी मिळणार असा विश्‍वास शेकाप तालुका चिटणीस वसंत यादव यांनी व्यक्त केला.

श्रीवर्धन तालुक्यामध्ये रोजगाराचा प्रश्‍न अजूनही कायम आहे. अनेक तरुण नोकरी व्यवसायानिमित्त मुंबईला जात आहे. ग्रामीण भागात पाण्याचा प्रश्‍नही गंभीर आहे. मात्र या प्रश्‍नांकडे पाहिजे तसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे सुनील तटकरे यांच्याबद्दल अनेकांमध्ये नाराजीचे सुर आहेत. लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीतून अनंत गीते यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीवर्धन तालुक्यात मतदारांनी आनंदोत्सव साजरा केला. अनंत गीते यांनी गावोगावी जाऊन मतदारांसह कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला जात आहे. जनसंवाद सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. शेकाप, शिवसेना (उध्दव ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट), काँग्रेस यांच्यासह अन्य घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते गीते यांना निवडून देण्यासाठी कामाला लागले आहे.

अनंत गीते यांना मुस्लीम समाजासह कुणबी समाजाकडूनही चांगला पाठींबा मिळत असून शेतकरी कामगार पक्षा इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या निवडणूकीत श्रीवर्धनधून गीतेच आघाडी मारतील असा विश्‍वास शेकाप तालुका चिटणीस वसंत यादव यांनी व्यक्त केला.

Exit mobile version