अन् बांगलादेशाची निर्मिती झाली

 प्रा. अविनाश कोल्हे

‘सोळा डिसेंबर 1971’ हा दिवस भारतीयांसाठी अनेक कारणांसाठी अतिशय महत्वाचा समजला जातो. या दिवशी ‘बांगलादेश’ नावाच्या देशाचा जन्म झाला, एवढया पुरते या दिवसाचे महत्व सीमित नाही. या दिवसांचे महत्व अनेक पातळयांवर आहे. ते समजून घेतले पाहिजे. एक महत्व म्हणजे या दिवशी बॅ.जिन्हांचा ‘द्विराष्ट्र’ हा सिद्धांत खोटा ठरला. पूर्व पाकिस्तानच्या (आताचा बांगलादेश) निःशस्त्र आणि निरपराध मुस्लिम जनतेवर पश्‍चिम पाकिस्तानच्या मुस्लिम सैन्याने अनन्वित अत्याचार केले होते. याच्या विरोधात बांगला जनतेने दिलेल्या ऐतिहासिक लढयानंतर ‘बांगलादेश’चा जन्म झाला. या घटनेमुळे आधूनिक काळात धर्म आणि शासन व्यवस्था वेगळया ठेवल्या पाहिजे, या निधर्मीवादाच्या तत्वाला फार मोठं बळ मिळालं. त्या ऐतिहासिक घटनेचा, त्या ऐतिहासिक दिवसाचा आता सूवर्णमहोत्सव साजरा होत आहे. या सोहळयात भारतीय लष्कर आणि भारतीय जनता मनांपासून सहभागी झालेली आहे. ही ऐतिहासिक घटना प्रत्यक्षात आणण्यात आपला सिंहाचा वाटा होता.
याची सुरूवात 1970 साली पाकिस्तानात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणूकांपासून झाली. या निवडणूकांत पूर्व पाकिस्तानात असलेल्या शेख मुजिब उर रेहमान यांच्या ‘अवामी लिग’ या पक्षाला पाकिस्तानच्या संसदेत बहुमत मिळाले होते. या निवडणूका झाल्या तेव्हा पाकिस्तानात लष्करशहा याहयाखान सत्तेत होते. पाकिस्तानातील विविध सत्ताकेंद्रावर ऊर्दू भाषिक मुसलमानांचे वर्चस्व होते व आजही आहे. त्यांनी मुजिब रेहमान यांना पंतप्रधानपदी तर बसू दिले नाहीच. उलट त्यांना अटक करून तुरूंगात टाकले. त्यामुळे पूर्व पाकिस्तानात असंतोष माजला होता. पश्‍चिम पाकिस्तानातील लष्करशहांनी सैन्याचा वापर करून हा असंतोष दडपण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. पाकिस्तानी सैन्याचे अमानुष अत्याचार सहन न झाल्यामुळे अक्षरशः लाख्खो बांगला निर्वासित भारताच्या आश्रयाला आले. यामुळे भारताला या समस्येत लक्ष घालणे भाग पडले. भारतीय अर्थव्यवस्था हा ताण आर्थिक ताण सोसू शकत नव्हती. तरीही भारताने अनेक महिने लष्करी कारवाई करण्याचा मोह टाळला. त्याऐवजी उच्च दर्जाच्या राजनयाचा वापर करून जागतिक पातळीवर जनमत तयार केला. यासाठी इंदिरा गांधींनी जगातील महत्वाच्या देशांचे दौरे केले आणि भारताची बाजू प्रभावीपणे मांडली. असे असले तरी भारतीय नेतृत्वाला अंदाज होता की लवकरच युद्धाला तोंड फुटेल. परिणामी भारत युद्धाची तयारी करत होताच. भारताच्या अंदाजानुसार 3 डिसेंबर रोजी युद्धाला तोंड फुटले. पाकिस्तानच्या हवाईदलाने अमृतसर, अंबाला, श्रीनगर वगैरे भारतीय शहरांवर हल्ले केले. नंतरच्या दहाबारा दिवसांत भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या लष्कराला जबरदस्त प्रत्युत्तर दिलं. यात चार डिसेंबर रोजी झालेल्या लोंगोवाल येथील भूयुद्ध, चार डिसेंबर रोजी बंगालच्या उपसागरात भारतीय नौसेनेतील ‘कारंज’ या नौकेने पाकिस्तानची ‘गाझी’ बुडवली, आठ डिसेंबरला भारतीय नौदलाने कराची शहरावर केलेला हल्ला वगैरे गौरवशाली इतिहास नोंदवला आहे. भारताचे खरे लक्ष्य होते लवकरात लवकर पूर्व पाकिस्तानवर असलेला पश्‍चिम पाकिस्तानचा ताबा संपवणे. आपली सर्व तयारी त्या दिशेने केलेली होती. शेवटी याला यश आले आणि पूर्व पाकिस्तानातील लष्करप्रमुख ए ए के नियाझी यांनी आपल्या 93 हजार सैन्यांसह बिनशर्त शरणागती पत्करली.
या ऐतिहासिक घटनेचं दुसरं महत्व म्हणजे बांगलादेशच्या निर्मितीमुळे दक्षिण आशियाचा भूगोल कायमचा बदलला. त्याअगोदर म्हणजे 1947 ते 1971 भारताला पश्‍चिम सीमेवर तसेच पूर्व भागातील सीमेवर सतत लक्ष ठेवावे लागत असे. उत्तर सीमेवर बलाढय चीन तर पश्‍चिम आणि पूर्व सीमेवर आपल्या वाईटावर कायमचा टपलेला पाकिस्तान, असे ते तणावपूर्ण दिवस होते. ही स्थिती डिसेंबर 1971 नंतर कायमची बदलली. तेव्हापासून एक हात तुटलेला पाकिस्तान आपल्याला सतत घाबरून असतो. त्याअगोदर पाकिस्तानला स्वतःच्या लष़्क़री सामर्थ्याचा आणि अमेरिकेने दिलेल्या लष्करी सामुग्रीचा, खास करून ‘पॅटन’ या रणगाडयांचा फार गर्व होता. याच गर्वातून पाकिस्तानने ऑक्टोबर 1965 मध्ये भारतावर अचानक हल्ला केला होता. त्यांचा मुळ हेतू म्हणजे काश्मीर जिंकून घेणे, हा होता. तेव्हाचे पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि राष्ट्राध्यक्ष जनरल अयुबखान सतत गर्वाने म्हणत असत की ‘सुबहका नाष्टा जयसलमेरमें करेंगे, दोपहरका खाना अमृतसरमें और रातका खाना दिल्लीमें. थोडक्यात म्हणजे पाकिस्तानी राज्यकर्त्यांना भारत जिंकणं हा एका दिवसाच खेळ आहे, असं वाटतं होतं. तेव्हासुद्धा भारताने पाकिस्तानी लष्कराचा नक्षा उतरवला होता. पण तो निर्णायक पराभव नव्हता. पाकिस्तानचा असा निर्णायक पराभव डिसेंबर 1971 मध्ये झाला. यातून बांगलादेशचा जन्म झाला.
नेमकं याच कारणासाठी पाकिस्तानला अफगाणीस्तानात स्वतःचे बाहुले असलेले सरकार हवे आहे. या मागची रणनीती अशी की जर भारताने सर्व शक्तीनिशी पाकिस्तानवर युद्ध लादले तर पाकिस्तानला माघार घ्यायला फक्त अफगाणीस्तान हा देश आहे. अफगाणीस्तानने माघार घेत असलेल्या पाकिस्तानला मदत करावी. यासाठी अफगाणीस्तानात आपल्या खिश्यातील सरकार हवे, अशी रचना पाकिस्तानच्या मनात असते. याला सामरिक तज्ञ ‘स्ट्रॅटेजिक डेप्थ’ म्हणतात. या रणनीतीचं जनकत्व 1980 च्या दशकात पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख जनरल मिर्झा अस्लम बेग यांच्याकडे जातं. पाकिस्तानला असा विचार करणं भाग पडलं. याचे एकमेव कारण म्हणजे पूर्व पाकिस्तानच्या ऐवजी 1971 साली बांगलादेश निर्माण झाला.
या घटनेचं तिसरं महत्व भारताने अवघ्या पंधरवडयात पूर्व पाकिस्तानच्या सैन्यावर मिळवलेल्या लष्करी विजयात आहे. भारतीय सैन्यदलाचे प्रत्यक्ष नेतृत्व करणाया लेफ्ट. जनरल जगजितसिंग अरोरा यांच्या सैन्याने अभूतपूर्व शौर्य दाखवत पूर्व पाकिस्तानात असलेले पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख जनरल ए. के. नियाझी यांना सुमारे एक लाख सैन्यांसह शरण येण्यास भाग पाडले. जगातील अनेक लष्करी महाविद्यालयात ‘बांगलादेश युद्ध’, या युद्धासाठी आखलेल्या योजना वगैरेंचा बारकाईने अभ्यास केला जातो.  विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ‘असा चमत्कार करणारे भारतीय लष्कर’ म्हणून आपला सार्थ गौरव केला जातो.
या मुद्दातून समोर येणारं चवथं महत्व! भारतीय समाज गुलाम होण्याचाच लायकीचा आहे, इथं परकीय आक्रमक आले, युद्धं जिंकले आणि स्थानिकांना गुलाम केलं..असा आपला इतिहास आहे. हा अर्थातच खरा आहे. मात्र मुळात आपला समाज गुलाम होण्याचाच लायकीचा आहे का, हा खरा आधूमिक काळातला प्रश्‍न आहे. या गृहितकाला पहिला तडाखा मिळाला पहिल्या महायुद्धादरम्यान. या युद्धात भारतीय सैन्याने युरोपात अनेक ठिकाणी झालेल्या लढायांत अभूतपूर्व पराक्रम गाजवला. या युद्धात वीरमरण मिळालेल्या लाख्खो सैनिकांच्या स्मरणार्थ इंग्रज सरकारने नवी दिल्लीत ‘इंडिया गेट’ उभारलं. एवढंच नव्हे तर हा भीमपराक्रम पाहून इंग्रजांच्या लक्षात आलं की अशा शूर समाजाला फार काळ गुलामगिरीत ठेवता येणार नाही. म्हणूनच फेब्रुवारी 1917 मध्ये ब्रिटीशांनी संसदेत जाहिर केले की भारताला हळुहळू आणि निश्‍चितपणे स्वयंशासन दिले जाईल. हा दिवस जरी पंधरा ऑगस्ट 1947 रोजी उजाडला तरी याची सुरूवात फेब्रुवारी 1917 मध्ये झालेली आहे. आणि त्याला कारणीभूत होता भारतीय सैन्याचा भीमपराक्रम! या भीमपराक्रमात तरीही एक त्रुटी होती. ती म्हणजे हा पराक्रम इंग्रजांच्या नेतृत्वाखाली गाजवला होता. परिणामी याचे सर्व श्रेय ब्रिटीशांना दिले गेले. डिसेंबर 1971 चे बांगलादेश युद्ध मात्र सर्व पातळयांवर, सर्व प्रकारे ‘भारतीय युद्ध’ होते. या युद्धाची पूर्वतयारी, लष्कराच्या तिन्ही शाखांमध्ये उच्च दर्जाचा समन्वय, राजकीय नेतृत्वाचा पूर्ण पाठिंबा वगैरे घटक एकत्र आले होते. यात नेहमी इंदिराजींना श्रेय दिले जाते. ते योग्यच आहे. मात्र अनेक जेष्ठ लष्करी अधिकारी यातल्या श्रेयाचा मोठा भाग तत्कालिन संरक्षण मंत्री जगजीवनराम यांना देतात. या विजयामुळे ‘भारतीय समाज गुलाम होण्याच्याच लायकीचा आहे’ वगैरे हजारो वर्षांपासून लागलेला कलंक कायमचा धुवून निघाला. या कारणांसाठी हा दिवस भारतीयांसाठी फार महत्वाचा आहे.

Exit mobile version