| पेण | प्रतिनिधी |
गेली अनेक वर्षे शासनाकडे प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य करण्यात याव्यात यासाठी पेणमध्ये एकात्मिक बालविकास कार्यालयावर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचार्यांच्या वतीने उपाध्यक्षा रश्मी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता.
यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात घोषणा देत सरकारच्या वेळकढूपणा धोरण आणि कमर्चार्यांवर वरिष्ठांकडून सतत होणार दबाव या विरोधात हा मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या उपाध्यक्षा रश्मी म्हात्रे यांनी सांगितले कि, गेली 5 वर्षे अंगणवाडी सेविकांना मानधनात वाढ करण्यात आली नसून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रत्येक तालुक्यात मोर्चा काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अंगणवाडी सेविकांना मानधनात वाढ करण्यात यावी, उच्च न्यायालयाचे आदेश असून सुद्धा पोषण आहाराचे अॅप मराठीत करण्यात आले नसून ते अॅप मराठीत उपलब्ध करून मिळावे, अंगणवाडी सेविकांना शासकीय दर्जा मिळावा, पेन्शन सुरु व्हावी. या प्रमुख मागण्या घेऊन आज हा मोर्चा काढण्यात आला होता.
यावेळी संघटनेच्या उपाध्यक्षा रश्मी म्हात्रे, संघटक दिनकर म्हात्रे, बिटप्रमूख शर्मिला म्हात्रे, ज्योती डंगर, चंद्रकांता पाटील, आशा म्हात्रे, सुनंदा पाटील आदींसह अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी प्रकल्प प्रमुख चेतन गायकवाड यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.