| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यातील सहा प्रकल्पांसाठी नगर विकास विभागाने निधीची भरभरून तरतूद केल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील सहा विविध प्रकल्पांसाठी केंद्र शासनाने 1 हजार 304 कोटी रुपयांच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. त्यातील पहिल्या टप्प्यामध्ये 50 टक्के अर्थात 652 कोटी रुपयांचा निधी केंद्र शासनाकडून राज्याला मिळणार आहे. त्यानुसार राज्याच्या नगर विकास विभागाने एमएमआरडीए, पीएमआरडीए आणि सिडको प्रशासनांना 652 कोटी रुपयांचा निधी वळता केला आहे. परिणामी केंद्राची नजर असलेल्या राज्यातील सहा प्रकल्पांना आता गती मिळणार आहे.
या प्रकल्पांत मुंबईतील एमएमआरडीएच्या शिवडी-वरळी उन्नत मार्ग, कुर्ला ते वाकोला उड्डाणपूल आणि बीकेसी ते एलबीएस उड्डाणपूल यांवरील उन्नत मार्गिका, तसेच बीकेसी ते वाकोला जंक्शन उन्नत मार्गिकेचा समावेश आहे. याशिवाय पुणे विद्यापीठ चौकातील पीएमआरडीए अंतर्गत येणाऱ्या मेट्रो रेल मार्गिकेसोबत एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाची उभारणी होणार आहे. दरम्यान, सिडको अंतर्गत येणार्या कोंढाणे प्रकल्प पाणी पुरवठा योजना आणि बाणगंगा प्रकल्प पाणी पुरवठा योजना मार्गी लावण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. एकूणच मुंबई , नवी मुंबई आणि पुणे महापालिका काबीज करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कामाला लागल्याचे दिसत आहे.