लाखोंचा शासकीय निधी वाया गेल्याची चर्चा, जबाबदारांवर कारवाईची मागणी
| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील शिर्की ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक 15 मधील अंगणवाडीची इमारत न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर जमीनदोस्त करण्यात आली. सीआरझेड क्षेत्रात आवश्यक नियम व परवानग्यांचे पालन न करता हे बांधकाम करण्यात आल्याचे न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान समोर आल्यानंतर 9 जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी रमाकांत पाटील आणि काशिनाथ ठाकूर यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेत संबंधित जागा एमसीझेडएमए क्षेत्रात असल्याने आवश्यक परवानग्यांशिवाय बांधकाम करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच बांधकामादरम्यान मॅन्ग्रोव्हची तोड झाल्याचाही आरोप करण्यात आला होता.
न्यायालयीन सुनावणीत सादर करण्यात आलेल्या नोंदींच्या आधारे संबंधित बांधकाम नियमबाह्य असल्याचे आढळल्याने इमारत पाडण्याचे आदेश देण्यात आले.
त्यानुसार प्रशासनाने संबंधित अंगणवाडीची इमारत पाडली. या अंगणवाडीसाठी शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्च झाला होता. मात्र इमारत पाडावी लागल्याने हा निधी वाया गेल्याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर बांधकामासाठी आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्रे, परवानग्या आणि कागदपत्रांची पडताळणी संबंधित विभागांनी केली होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच या नियमबाह्य बांधकामासाठी नेमके कोण जबाबदार, ग्रामपंचायत की पंचायत समितीचा बांधकाम विभाग, याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
याचिकाकर्ते रमाकांत पाटील यांच्या कुटुंबीयांनी शासनाच्या वाया गेलेल्या निधीची वसुली संबंधित जबाबदार अधिकारी व संबंधितांकडून करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांनी सांगितले की, संबंधित प्रकरणात जबाबदारी निश्चित करण्यासाठी पंचायत समितीच्या बांधकाम अभियंत्यांना पत्र देण्यात आले असून त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
