रायगडातील अंगणवाड्या डिजिटल करणार

| पाली | प्रतिनिधी|

महिला व बाल विकास हा व्यापक व मोठा विभाग आहे केंद्र, राज्य शासनाकडून अनेक योजना दोन्ही घटकांसाठी आहेत त्यांची अंमलबजावणी देखील होत आहे, पण ती शेवटच्या घटकापर्यंत चांगल्या दर्जाने कशी पोहोचेल याकडे माझे निश्चित प्राधान्य दिले जाईल, तसेच जास्तीत जास्त अंगणवाड्या डिजिटल व दुरुस्त कशा होतील याकडे प्रामुख्याने लक्ष दिले जाईल. अशी ग्वाही महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी पाली येथे दिली.

तटकरे यांनी मंत्रीपद मिळताच पहिल्याच दिवसापासून रायगड जिल्हा दौऱ्याला सुरुवात केली आहे. पाली येथे बेघरआळी या अंगणवाडीला भेट दिली. त्यावेळी चिमुकल्यांनी त्यांचे गुलाब देऊन स्वागत केले. त्यांनतर योजनांसंदर्भात आढावा घेत अधिकाऱ्यांना सुचनाही केल्या.

जिल्ह्यासह सुधागड तालुक्यातील जर्ज झालेल्या अंगणवाडीच्या इमारतींमध्ये लवकरच सुधारणा केली जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले. अदिती तटकरे यांनी अंगणवाडी येथे गरोदर मातेची ओटी भरण व सहा महिने झालेल्या मुलाला अन्न प्राशन केले. त्यानंतर या दौऱ्या दरम्यान पाली गुजराती समाजहॉल येथे महिला व बाल विकास विभाग अंतर्गत महिला आर्थिक विभाग महामंडळ रायगड जिल्हा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिला बचत गट सक्षमीकरण कार्यक्रमाला भेट देऊन तटकरे यांनी उपस्थित महिलांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

यावेळी संदेश शेवाळे, दादा कारखानीस, सुनील राऊत, डी.सी.चव्हाण, पाली नगराध्यक्षा प्रणाली शेळके, रूपाली भणगे, साक्षी दिघे, महिला बालविकास जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक, जिल्हा विस्तार अधिकारी अर्पणा शिंदे, तहसीलदार उत्तम कुंभार, सुधागड तालुका बाल विकास प्रकल्प अधिकारी रंजना म्हात्रे, ललित ठोंबरे, अंकुश आपटे, कल्याणी दपके, मधुरा वरंडे, सुलतान बिनसेकर, सुधीर भालेराव, विक्रम परमार, मोहम्मद धनसे, सुजाता वडके, अस्मिता घरत आदींसह अंगणवाडी सेविका व अधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version