व्याह्याने व्याह्याला मारहाण, गुन्हा दाखल
| पोलादपूर | प्रतिनिधी |
पोलादपूर तालुक्यातील कामथे फौजदारवाडी येथे मुलगा-मुलीने पळून जाऊन लग्न केल्याच्या रागातून व्याह्याने व्याह्यालाच मारहाण केल्याची घटना घडली असून, याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अनोख्या घटनेची तालुक्यात सर्वत्र चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 8 मार्च 2026 रोजी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास कामथे माडाची वाडी येथे ही घटना घडली. तक्रारदार सखाराम गणपत कदम (55) रा. कामथे फौजदारवाडी, पो. बोरघर, ता. पोलादपूर यांचा मुलगा आदेश कदम हा वाई येथे कामासाठी राहात होता. दरम्यान, त्याने कामथे फौजदारवाडी येथील नामदेव सखाराम गोगावले यांच्या मुलीसोबत पळून जाऊन लग्न केल्याचे समोर आले. या घटनेचा राग मनात धरून आरोपी नामदेव गोगावले यांनी सखाराम कदम यांना “तू गावात राहू नकोस” असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच ठार मारण्याची धमकी देत हातातील लाकडी काठीने त्यांच्या डाव्या हातावर मारहाण करून दुखापत केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार कृष्णा जागडे हे सहायक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
