वनविभागाकडून 13 गुरांची भरपाई
| पोलादपूर | प्रतिनिधी |
तालुक्यातील रत्नागिरी आणि सातारा सीमावर्ती भागातील जंगलानजीकच्या लोकवस्त्यांमध्ये गेल्या वर्षभरात बिबट्याच्या हल्ल्यात एकूण 14 जनावरांचा बळी गेला असून, अलीकडेच शनिवार, दि. 28 सप्टेंबर रोजी खडकवणे कातळी दत्तवाडीलगतच्या घनदाट जंगलात बिबट्याच्या हल्ल्यात श्रीपत सकपाळ या शेतकर्याचा बैल ठार झाल्याची घटना घडल्यानंतर ही संख्या 14 झाली आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार झाल्याच्या घटनेनंतर शनिवारी दुपारी या घटनेची माहिती नागेश श्रीपत सकपाळ व पळचिल पोलीस पाटील आनंद निविलकर यांनी वनविभागाला कळविली. यावेळी पोलादपूर मंडलचे वनपाल बाजीराव पवार, वनरक्षक अमोल रोकडे व वनकर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
याप्रकरणी पोलादपूर मंडल वनविभागाचे वनपाल बाजीराव पवार यांनी श्रीपत सकपाळ या शेतकर्याचा बैल ठार झाल्याच्या घटनेपूर्वी पोलादपूर तालुक्यातील शेतकर्यांची 13 जनावरे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ठार झाल्याची माहिती देऊन त्या सर्व जनावरांच्या मालकांना त्यांच्या बँकअकाऊंटमध्ये भरपाईपोटी थेट रक्कम जमा करण्यात आली असल्याचे सांगितले. यामध्ये सुरेखा गोपाळ खुटेकर, रा. परसुले यांच्या 2 बकर्या, चंद्रभागा महाबदी रा.बोरावळे 1 गाय, गणपत सावंत, रा. करंजे 1 बैल, दिनकर रामजी कोंडरे रा.ताम्हाणे 1 गाय, लक्ष्मीबाई रामचंद्र बर्के रा. ओंबळी 1 गाय, मारूती रामचंद्र अलगुडे रा. कामथे 1 गाय, शंकर रामचंद्र कुरणे रा. किनेश्वर 1 गाय, राजू धाऊ बर्गे रा. ओंबळी 1 गाय, राघू बाबू कात्रट रा.करंजे 1 गाय, सखाराम गणपत कदम रा. कामथे 1 गाय, रवींद्र एकनाथ जाधव रा. पळचिल 1 म्हैस, तुकाराम रावजी जाधव रा.भोगाव बुद्रुक 1 गाय अशी एकूण 13 जनावरांची नुकसानभरपाई संबंधित शेतकर्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे.