वनविभाग अद्याप सुस्त, जनजागृती कधी करणार?
| बोर्लीपंचतन | वार्ताहर |
श्रीवर्धन तालुक्यासह विविध भागांत गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्या दिसण्याच्या घटना घडत आहेत. पुन्हा एकदा वाहन चालक प्रसन्न विचारे यांना श्रीवर्धन-दांडगुरी-बोर्ली प्रवास करत असताना हुणेरवेलीच्या उतारात बिबट्या रस्ता ओलांडून जात असताना दिसला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, या सर्व गोष्टींकडे वनविभाग गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
शिकारीच्या शोधात तालुक्यातील विविध ठिकाणी बिबट्या फिरत असण्याच्या घटना वेळोवेळी घडत आहेत. वेळास आगार, सर्वे, वांजळे, खुजारे, बोर्ली-पंचतन, वावे-पंचतन, दांडगुरी, हुणेरवेली अशा भागात अनेकदा गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्या बघीतल्याच्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सद्यःस्थितीत जंगलामध्ये शिकार मिळत नसल्याने बिबट्याने आपला मोर्चा लोकवस्तीमध्ये वळविला आहे. घराबाहेर बांधलेले श्वान, गोठ्यात बांधलेल्या गायी, म्हशी यांच्यावर भरवस्तीत घुसून भरदिवसा हल्ला केल्याच्या घटना घडत असतानादेखील याचे वनविभागाला कोणत्याही प्रकारचे सोयरसुतक नसल्याचे निदर्शनास येत आहे. या सर्व घटनेने खेडेगावातून रोज पोट भरण्यासाठी श्रीवर्धन तसेच बोर्ली पंचतन शहराकडे येणारे कर्मचारी भयभीत झाले आहेत, त्याचप्रमाणे वाहन चालकांमध्येदेखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभाग एखाद्या ग्रामस्थांचा जीव गेल्यानंतरच जागा होणार का, असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.